Join us

रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 4:20 PM

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (आरबीआय) नुकताच एका बँकेचा परवाना रद्द केलाय. या शिवाय सेंट्रल बँकेलाही मोठा दंड ठोठावलाय, जाणून घ्या काय आहे कारण?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (आरबीआय) नुकताच एका बँकेचा परवाना रद्द केलाय. नियमांचं पालन न केल्यामुळे आरबीआयनं पूर्वांचल सहकारी बँकेचा परवाना रद्द केला. ही बँक यापुढे कोणतेही बँकिंग व्यवहार करू शकणार नाही. गुडरिटर्न्सच्या एका रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेनं सोनाली बँक पीएलसीला ९६.४० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. केवायसी निर्देश २०१६ आणि काही निकषांचे पालन न केल्यामुळे बँकेला हा दंड ठोठावण्यात आलाय. 

सेंट्रल बँकेलाही दंड 

रिझर्व्ह बँकेनं (आरबीआय) सेंट्रल बँक ऑफ इंडियाला १.४५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयने दिलेल्या काही मार्गदर्शक सूचनांचं पालन न केल्यानं हा दंड ठोठावण्यात आल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय. हे निर्देश लोन्स अँड अॅडव्हान्सेस आणि कस्टमर प्रोटेक्शनशी संबंधित आहेत. रिझर्व्ह बँकेनं ३१ मार्च २०२२ पर्यंतच्या वित्तीय स्थितीबाबत सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या सुपर अॅडव्हायझरी इव्हॅल्युएशनसाठी (आयएसई २०२२) वैधानिक छाननी केली होती. आरबीआयनं सेंट्रल बँक ऑफ इंडियाला नोटीस बजावून मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात अपयशी ठरल्याबद्दल दंड का आकारू नये, अशी विचारणा केली आहे. बँकेच्या उत्तराचा विचार केल्यानंतर आरबीआयला बँकेवरील आरोप योग्य असल्याचं आढळलं. 

सेंट्रल बँकेच्या शेअरची स्थिती 

गेल्या वर्षभरात सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये १३७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. १९ जून २०२३ रोजी बँकेचा शेअर २७.५२ रुपयांवर होता. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा शेअर १४ जून २०२४ रोजी ६५.४१ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या २ वर्षात सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये २८८ टक्क्यांची वाढ झाली आहे. या कालावधीत बँकेचे शेअर्स १६ रुपयांवरून ६५ रुपयांच्या पुढे गेले आहेत. या वर्षी आतापर्यंत बँकेच्या शेअरमध्ये सुमारे ३० टक्के वाढ झाली. बँकेच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी ७६.८५ रुपये आहे. तर, बँकेच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी २६.५३ रुपये आहे. 

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँक