Join us  

RTGS आणि NEFT जुनं झालं! आता RBI घेऊन येतीये नवीन पेमेंट स‍िस्‍टीम; जाणून घ्या डिटेल्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2023 4:12 PM

LPSS: जाणून घ्या या पेमेंट सिस्टीमबद्दल माहिती.

Light Weight Portable Payment System: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून लाइट वेट अँड पोर्टेबल पेमेंट स‍िस्‍टीम(LPSS) व‍िकस‍ित करण्यासाठी काम केले जात आहे. नैसर्गिक आपत्ती आणि युद्धसदृश परिस्थितीत महत्त्वाच्या व्यवहारांसाठी ही पेमेंट सिस्टम चालवता येईल. RBI च्या मते, ही प्रस्तावित लाइट वेट अँड पोर्टेबल पेमेंट सिस्टम(LPSS) पारंपारिक तंत्रज्ञानापेक्षा वेगळी असेल. काही विशेष कर्मचारी ही यंत्रणा कुठेही चालवू शकतील.

RTGS, NEFT आणि UPI सारख्या विद्यमान पेमेंट सिस्टीम सध्या पेमेंटसाठी कार्यरत आहेत. या पेमेंट सिस्टीम मोठ्या प्रमाणात पेमेंट हाताळण्यासाठी डिझाइन केल्या आहेत. या पेमेंट सिस्टीम अॅडव्हान्स आयटी पायाभूत सुविधांवर काम करतात. पण, नैसर्गिक आपत्ती आणि युद्धजन्य परिस्थितीतसह इतर गंभीर परिस्थितीत वापरता येईल अशी यंत्रणा तयार करण्याची गरज आहे. हे उद्दिष्ट लक्षात घेऊन, RBI ने LPSS ची योजना आखली आहे, जी पारंपारिक तंत्रज्ञानापासून स्वतंत्र असेल आणि अगदी मोजक्या कर्मचाऱ्यांद्वारे कुठूनही चालवता येईल.

आरबीआयने सांगितले की, सध्या या तंत्रज्ञानाच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरवर काम करणे सुरू आहे. जेव्हा आवश्यकता असेल, तेव्हा ही सक्रिय केली जाईल. सरकार आणि बाजाराशी संबंधित व्यवहार किंवा अर्थव्यवस्था स्थिर करण्यासाठी महत्त्वाचे असणारे व्यवहार पूर्ण करण्यासाठी ही उपयुक्त ठरेल.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकभारतपैसा