Dollar vs Rupee : भारत सध्या आर्थिक संकटात सापडल्याचे पाहायला मिळत आहे. देशात महागाई वाढतेय, शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता आहे. अशा परिस्थितीत भारतीय चलनाने इतिहासातील सर्वात कमकुवत पातळी गाठली आहे. सोमवारी, रुपया १२ पैशांनी घसरला आणि डॉलरच्या तुलनेत ८४.७१ वर बंद झाला, जो आजपर्यंतचा सर्वात निच्चांकी पातळी आहे. रुपयाच्या घसरणीचा सर्वसामान्यांवर काय परिणाम होतो? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जर तुम्हाला वाटत असेल की रुपयातील चढउतार फक्त आरबीआय, सरकार आणि अर्थव्यवस्थेपुरता मर्यादित आहे. तर तुमचा अंदाज पूर्णपणे चुकीचा आहे. यामध्ये कोणतीही घट झाल्यास त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होतो.
नुकतेच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचा समावेश असलेल्या ब्रिक्स देशांना धमकी दिली होती. जर डॉलरला पर्यायी चलन काढले तर ब्रिक्स देशांवर १०० टक्के आयात शुल्क लादण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर रुपयामध्ये ऐतिहासिक घसरण पाहायला मिळत आहे.
महागाईचा भडका उडणार?
कुठल्याही देशातून एखादी गोष्ट आयात करायची झाल्यास त्यासाठी डॉलर हे चलन वापरले जाते. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने आयात माल खरेदीसाठी देशाला जास्त पैसे खर्च करावे लागतील. परिणामी देशात महागाई वाढण्याची शक्यता आहे. जर तुम्ही असा विचार करत असाल की सामान्य माणूस आयात केलेल्या वस्तू वापरत नाही. पण, प्रत्यक्षात भारत आपल्या गरजेच्या ८५ टक्के तेल बाहेरून आयात करतो. तेल म्हणजेच पेट्रोल आणि डिझेल महाग झाले तर मालवाहतूकही वाढेल. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या वापराच्या वस्तूंवर होईल, आणि देशात महागाई वाढेल.
अर्थव्यवस्थेवर दबाव
डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरही होणार आहे. आरबीआयचा परकीय चलनाचा साठा कमी होऊ शकतो. कारण रुपयाची घसरण थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँकेला आपल्या गंगाजळीतून डॉलर खर्च करावे लागतील. याशिवाय देशातील निर्यातदारांना फायदा होणार असला तरी बाहेरून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि खते आयात करण्यासाठी आयातदारांना जास्त पैसा खर्च करावा लागणार आहे. साहजिकच आयातीत घट झाली तर अर्थव्यवस्थाही कमकुवत होईल.
परदेशात शिक्षण आणि प्रवास महागणार
रुपया घसरल्याचा सर्वात मोठा तोटा सर्वसामान्य पालकांना बसणार आहे. ज्यांची मुले परदेशात शिक्षण घेत आहेत. कारण, एकीकडे शिक्षण शुल्क महागणार असून, विद्यार्थ्यांना परदेशात राहण्यासाठीही जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. कारण, परदेशात व्यवहार करण्यासाठी डॉलर्स वापरावे लागतात. यासाठी पालकांना जास्त पैसे मोजावे लागतील. त्याचप्रमाणे परदेशात सहलीसाठी जाणाऱ्यांनाही याचा फटका बसला आहे.