मुंबई : सारस्वत बँक या देशातील सहकार क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेची १०६ वी सर्वसाधारण सभा शनिवार २७ जुलै रोजी प्रा. बी. एन. वैद्य सभागृह, राजा शिवाजी विद्यासंकुल, दादर (पूर्व) येथे झाली.
बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांनी यावेळी नमूद केले की, बँकेने ८२ हजार कोटींचा टप्पा पार केला आहे. ३१ मार्च २०२४ रोजी बँकेचा एकूण व्यवसाय ८२,०२४.७७ कोटींवर पोहोचला आहे. यात ४९,४५७.३१ कोटी रुपये इतक्या ठेवींचा आणि ३२,५६७.४६ कोटी रुपयांच्या कर्जांचा समावेश आहे.
बँकेचा ढोबळ नफा ७८६.४३ कोटी रुपये इतका असून निव्वळ करोत्तर नफा गतवर्षीच्या तुलनेत ३५१ कोटींवरून ५०२.९९ कोटी रुपये इतका झाला आहे. हा नफा बँकेच्या १०६ वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक व नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राच्या इतिहासातदेखील सर्वोच्च म्हणून नोंदविला गेला आहे.
बँकेची ढोबळ अनुत्पादित कर्जे २.८८ टक्के इतकी म्हणजेच बँकेच्या इतिहासात सर्वांत कमी म्हणून नोंदविली गेली आहेत. तसेच निव्वळ अनु्त्पादित कर्जे सलग दोन वर्षांपासून शून्य टक्क्यांवर राहिली आहे. बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण १७.२८ टक्के इतके आहे. बँकेने ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी भागधारकांना १७.५० टक्के इतका लाभांश जाहीर केला आहे. सारस्वत बँकेच्या ३०२ शाखांच्या विस्ताराचे जाळे भारतातील महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या सहा राज्यांमध्ये पसरले असून या शाखांमध्ये ४,५०० कर्मचारीवृंद कार्यरत आहे. (वा.प्र.)