Join us

बचतीचं प्रमाण झालं कमी, लोकांनी घेतलं रेकॉर्ड ब्रेकिंग कर्ज; रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 11:01 AM

लोकांचं बचतीचं प्रमाण कमी झालं असून त्यांनी रेकॉर्ड ब्रेकिंग कर्ज घेतल्याची माहिती आता समोर आलीये आणि यावरूनच रिझर्व्ह बँकेलाही चिंता सतावू लागलीये.

गेल्या काही महिन्यांमध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणात घर, वाहनं आणि आणखी काही वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याचं वृत्त तुम्ही ऐकलं असेल. अशातच लोकांचं बचतीचं प्रमाण कमी झालं असून त्यांनी रेकॉर्ड ब्रेकिंग कर्ज घेतल्याची माहिती आता समोर आलीये आणि यावरूनच रिझर्व्ह बँकेलाही चिंता सतावू लागलीये. आर्थिक वर्षात बँकांच्या कर्जामध्ये जोरदार वाढ झाली असली तरी सध्या त्या दोन दशकांतील सर्वात मोठ्या ठेवींच्या संकटातून जात आहेत. रिझर्व्ह बँकेच्या (RBI) डेटावरून असं दिसून आलंय की बँकांचे कर्ज आणि ठेवीचं गुणोत्तर जवळपास २० वर्षांतील सर्वोच्च पातळीवर आहे. गृहकर्ज आणि इतर कर्जांसह सर्व श्रेणींमध्ये कर्जाची मागणी वाढली असल्याचं यामागील कारण आहे. 

बँकांचे क्रेडिट-ठेवी गुणोत्तर 

अहवालानुसार बँकांचं क्रेडिट आणि ठेवींचं गुणोत्तर २००५ पासूनच्या सर्वोच्च पातळीवर म्हणजेच ८० टक्क्यांवर आहे. म्हणजेच ठेवींच्या तुलनेत कर्ज घेण्याचं प्रमाण वाढलं आहे. हे प्रमाण सांगते की बँकेच्या ठेवींचा किती भाग कर्जासाठी वापरला जात आहे. आर्थिक वर्ष २०२४ चा डेटा २२ मार्च पर्यंतचा आहे, जो मागील आर्थिक वर्षाचा अखेरचा पंधरवडा होता. 

कुठे होतेय गुंतवणूक? 

कन्सल्टींग फर्म अल्वारेझ अँड मार्सलचे व्यवस्थापकीय संचालक भाविक हाथी यांनी यावर प्रतिक्रिया दिली. बँकांचे ग्राहक हाय रिटर्न, इक्विटी-लिंक्ड प्रोडक्टकडे वळत आहेत. ज्यामुळे ते कमी दराने बँकांमध्ये पैसे जमा करण्यापासून दूर जात आहेत. गेल्या काही महिन्यांतील इक्विटी मार्केटची ठोस कामगिरी आणि वाढती आर्थिक साक्षरता यामुळे गुंतवणूकदारांना अधिक परताव्याच्या दृष्टीने अशा सिक्युरिटीजमध्ये पैसे ठेवण्यास प्रोत्साहन मिळाल्याचंही ते म्हणाले. 

शेअर बाजार, रिअल इस्टेट क्षेत्रातून आव्हान 

बँकांनीही ग्राहकांकडून पैसे उभे करण्याच्या उद्देशाने गेल्या आर्थिक वर्षात व्याजदरात लक्षणीय वाढ केली आहे, परंतु त्यांना शेअर बाजार तसेच रिअल इस्टेट क्षेत्राकडून कठीण आव्हानाचा सामना करावा लागत आहे.  

गुंतवणुकीकडे लोकांचा कल बदलतोय 

लोकांची बचत दोन दशकांतील नीचांकी पातळीवर गेल्याचं अलीकडेच सांगण्यात आले. याबाबत आरबीआयनं स्पष्टीकरण दिलं होतं. लोकांच्या बचतीच्या सवयींमध्ये बदल झाला आहे. लोक आता बँकांमध्ये साधं व्याज घेण्याऐवजी इतर गुंतवणूक माध्यमांमध्ये पैसे गुंतवू लागले आहेत आणि घर, वाहन, सोने, शेअर्स, म्युच्युअल फंड इत्यादींमध्ये पैसे गुंतवत आहेत. त्यामुळे त्यांची बचत करण्याची सवय कमी होत आहे असं दिसतं, पण प्रत्यक्षात त्यांची गुंतवणूक शैली बदलली असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकगुंतवणूक