Repo Rate Hike : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) समुहाचे मुख्य आर्थिक सल्लागार सौम्य कांती घोष (Soumya Kanti Ghosh) यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (RBI) व्याजदर वाढीबाबत एक सल्ला दिला आहे. रिझर्व्ह बँकेला फेडरल बँक ऑफ अमेरिकाची कॉपी करणे थांबवावं लागेल, असं त्यांनी म्हटलंय. व्याजदर वाढीबाबत अमेरिकन केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हनं (US Federal Reserve) घेतलेले निर्णय तसेच्या तसे पुढे न्यायचे का? याबाबत रिझर्व्ह बँकेला गांभीर्यानं विचार करावा लागेल, असं घोष यांनी नमूद केलं.
व्याजदरात वाढ करण्याच्या बाबतीत अमेरिकेन केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हचं हुबेहुब अनुसरण करण्याबाबत रिझर्व्ह बँकेनं विचार केला पाहिजे. नजीकच्या काळात फेडरल रिझर्व्हचे दर वाढीचं चक्र संपलेलं दिसत नाही आणि आरबीआयनं वेगळा विचार करण्याची वेळ आली आहे, असं घोष म्हणाले.
थांबून विचार करण्याची गरज“आपण फेडरल रिझर्व्हचं जसंच्या तसं अनुसरण करू शकतो का? असं माझं म्हणणं आहे. कोणत्याही एका क्षणी आपल्याला याला विराम द्यावा लागेल आणि आधीच्या दर वाढीचा (RBI द्वारे) परिणाम सिस्टममध्ये कमी झाला आहे की नाही याचा विचार करणे आवश्यक आहे. फेडरल रिझर्व्हचे हे सत्र लवकरच संपेल असं मला दिसत नाही. ते आणखी तीन वेळा किंवा त्यापेक्षाही अधिक वेळा यात वाढ करू शकतात, असं घोष म्हणाले.
घोष इंडिया चेंबर ऑफ कॉमर्सनं आयोजित केलेल्या एका सत्रात बोलत होते. देशातील महागाई जानेवारी २०२३ मध्ये ६.५२ टक्क्यांवर पोहोचली आहे, जी आरबीआयच्या सहा टक्क्यांच्या अंदाजापेक्षा अधिक आहे. यापूर्वी, २०२२ मध्ये एकूण १२ महिन्यांपैकी १० महिन्यांत महागाई दर सहा टक्क्यांहून अधिक होता.