देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांसाठी विविध बचत योजना चालवते. बँकेच्या अनेक योजना अतिशय लोकप्रिय आहेत. यापैकी एक SBI एन्युटी डिपॉझिट प्लान (SBI Annuity Deposit Scheme) आहे. या योजनेत एकरकमी पैसे गुंतवावे लागतात. यानंतर, तुम्हाला दर महिन्याला व्याजाच्या रुपात पैसे मिळतात.
SBI च्या या योजनेतील गुंतवणुकीवर दर महिन्याला खात्रीशीर उत्पन्न मिळते. ग्राहकांना दरमहा प्रिन्सिपल अमाऊंटसह व्याज मिळते. बँक खात्यात जमा केलेल्या रकमेवर तिमाही चक्रवाढीच्या आधारावर व्याजाची गणना करते. एसबीआयच्या वेबसाइटनुसार, फिक्स्ड डिपॉझिटवर जितके व्याज मिळते, तितकंच व्याज या स्कीममध्ये गुंतवणूकीवर मिळते.
ॲन्युइटी डिपॉझिट प्लॅनमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना युनिव्हर्सल पासबुक जारी केले जाते. तुम्ही या योजनेत 36, 60, 84 किंवा 120 महिन्यांसाठी पैसे जमा करू शकता. SBI च्या कोणत्याही शाखेतून या योजनेचा लाभ घेता येईल. SBI ॲन्युइटी डिपॉझिट प्लॅनमध्ये जास्तीत जास्त ठेवीसाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. 1000 रुपये मंथली ॲन्युइटीनुसार तुम्ही या योजनेअंतर्गत तुमचे खाते उघडू शकता. टीडीएस कापल्यानंतर अॅन्युइटी दिली जाते आणि जोडलेल्या बचत खात्यात किंवा चालू खात्यात जमा केली जाते. या योजनेअंतर्गत बँक एका शाखेतून दुसऱ्या शाखेत खाते हस्तांतरित करण्याची सुविधा देते.
या योजनेत गुंतवलेल्या रकमेनुसार तुम्ही कर्जही घेऊ शकता. गरजेच्या वेळी, तुम्ही ॲन्युइटीच्या शिल्लक रकमेच्या 75 टक्क्यांपर्यंत कर्ज म्हणून घेऊ शकता. ठेवीदाराचा मृत्यू झाल्यास ही योजना मुदतपूर्तीपूर्वी बंद केली जाऊ शकते.