जर आपण देशातील सर्वात मोठ्या भारतीय स्टेट बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी आपल्यासाठी आहे. एसबीआयने वेगवेगळ्या कार्यकाळासाठी मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट म्हणजेच MCLR च्या दरात 10 बेसिस प्वाइंट्सने (0.1%) वाढ केली आहे. या वाढीनंतर, MCLR बेस्ड लोन घेणे महागणार आहे. त्यामुळे ईएमआयदेखील पूर्वीच्या तुलनेत अधिक द्यावा लागेल.
किती झाली वाढ -
या वाढीनंतर एका वर्षाचा MCLR 8.65% वरून 8.75% झाला आहे. तसेच, एक महिना आणि तीन महिन्याचा MCLR 8.20% वरून वाढून 8.30% झाला आहे. सहा महिन्यांचा MCLR आता 8.55% वरून 8.65% वर गेला आहे. तसेच दोन वर्षांचा MCLR 8.75% ने वाढून 8.85% करण्यात आला आहे. याच प्रमाणे, तीन वर्षांचा MCLR 8.85% वरून 8.95% वर पोहोचला आहे. होम आणि ऑटो लोनसह अधिकांश किरकोळ कर्ज, हे एक वर्षाच्या MCLR दराशी संबंधित असतात.
MCLR वाढीचा RBI रेपो रेट किंवा ट्रेझरी बिल उत्पन्नासारख्या बाह्य बेंचमार्कशी संबंधित कर्ज असलेल्या कर्जदारांवर कसलाही परिणाम होत नाही. ऑक्टोबर 2019 पासून, SBI सह बँकांना चलनविषयक धोरणात सुधारणेसाठी नवीन कर्ज या बाह्य बेंचमार्कशी जोडणे आवश्यक झाले आहे.
यातच शुक्रवारी, आपण व्यवसाय वाडविण्यासाठी बॉन्डच्या माध्यमाने 10 कोटी अमेरिकन डॉलर्सचा (जवळपास 830 कोटी रुपये) निधी उभारला असल्याचे एसबीआयने म्हटले आहे. तसेच शेअर बाजाराला दिलेल्या सूचनेत एसबीआयने म्हटले आहे की, ही रक्कम वरिष्ठ असुरक्षित फ्लोटिंग रेट बॉन्ड्सच्या माध्यमाने उभारण्यात आली आहे. याचा परिपक्वता कालावधी तीन वर्षांचा असून हे बॉन्ड्स 20 जून 2024 पर्यंत आपल्या लंडन शाखेतून जारी केले जातील, असेही एसबीआयने म्हटले आहे.