देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेनं (SBI) गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात वाढ केल्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदरात वाढ केली आहे आणि यात आता स्टेट बँकेचाही समावेश झाला आहे. याचा फटका गृहकर्जदारांना बसला आहे.
SBI च्या गृहकर्जाचे वाढलेले व्याजदर १५ डिसेंबर २०२२ पासून लागू झाले आहेत. बँकेने MCLR (MCLR), EBLR (EBLR) आणि RRLR (RRLR) म्हणजेच जवळपास सर्व प्रकारच्या कर्जाचे व्याजदर वाढवले आहेत.
SBI च्या कर्जाचा व्याजदर किती वाढला?
SBI च्या वेबसाइटनुसार, MCLR आधारित वेगवेगळ्या कालावधीच्या कर्जाचे व्याजदर ८ टक्के ते ८.६० टक्के आहे. पूर्वी ते ७.७५ टक्के ते ८.३५ टक्के होते. ऑटो, गृह आणि वैयक्तिक कर्ज यांसारख्या बँकेचे बहुतेक कर्ज व्याजदर यावर आधारित आहेत.
किती महाग झालं होमलोन?
SBI च्या म्हणण्यानुसार, सध्या त्यांच्या गृहकर्जावर किमान व्याजदर ८.९० टक्के इतका आहे. ज्यांचे CIBIL स्कोअर ८०० किंवा त्याहून अधिक आहे त्यांच्यासाठी हा व्याजदर आहे. त्याच वेळी, बँक यापेक्षा कमी सिबिल स्कोअर असलेल्यांना वेगवेगळ्या व्याजदरांवर उपलब्ध करून देते.
किती वाढणार EMI?
आता जाणून घेऊयात व्याजदर वाढल्यानंतर तुमच्या होम लोनच्या EMI मध्ये नेमकी किती वाढ होईल. जर तुम्ही २० वर्षांसाठी ३५ लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले आहे असे समजू. तुमचा CIBIL स्कोर देखील ८०० च्या वर असेल तर अशा परिस्थितीत बँक तुमच्याकडून ८.५५ टक्के व्याज आकारत होती, जे आता ८.९० टक्के इतके होईल.
जुन्या व्याज दरानुसार, तुमचा EMI ३०,४८५ रुपये होता, जो आता ३१,२६६ रुपये होईल. म्हणजेच तुमचा ईएमआय दरमहा ७८१ रुपयांनी वाढेल. म्हणजे वर्षभरात तुम्हाला ९,३७१ रुपये अधिकचे भरावे लागणार आहेत. आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की बँक ३१ जानेवारी २०२३ पर्यंत सणासुदीच्या ऑफर देत आहे. यानंतर व्याजदरात बदल होऊ शकतो.