SBI Net Profit : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. जानेवारी-मार्च निकालात बँकेच्या नफ्यात 24 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बँकेचे व्याजातून मिळणारे उत्पन्नही प्रचंड वाढले, ज्यामुळे बँकेने आता भागधारकांसाठी मोठा लाभांशही जाहीर केला आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक निकालांनुसार, जानेवारी-मार्च दरम्यानच्या 90 दिवसांच्या कालावधीत स्टँडअलोन आधारावर निव्वळ नफा वार्षिक 24 टक्क्यांनी वाढून 20,698 कोटी रुपये झाला आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात याच कालावधीत बँकेचा नफा 16,694 कोटी रुपये होता.
व्याज उत्पन्नात 19 टक्क्यांनी वाढ
या कालावधीत SBI चे व्याजातून मिळणारे उत्पन्न 19 टक्क्यांनी वाढून 1,11,043 कोटी रुपये झाले आहे. गेल्या वर्षी जानेवारी-मार्चमध्ये बँकेला 92,951 कोटी रुपयांचे व्याज उत्पन्न मिळाले होते. जर आपण बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नावर नजर टाकली, तर चौथ्या तिमाहीत ते 41,655 कोटी रुपये होते. हे मागील वर्षीच्या याच तिमाहीतील 40,393 कोटी रुपयांच्या उत्पन्नापेक्षा 3 टक्के जास्त आहे.
शेअरधारकांना बोनस मिळेल
तुम्ही SBI चे शेअर्स धारक असाल, तर तुम्हाला मोठा फायदा होणार आहे. बँकेने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी भागधारकांना प्रत्येक शेअरवर 13.70 रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे. याचा अर्थ तुम्ही SBI च्या शेअर्सवर चांगली रक्कम कमावणार आहात.
SBI वर सर्वसामान्यांचा 49 लाख कोटी रुपयांचा विश्वास
SBI ने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे देशातील सर्वसामान्यांचे 49,16,007 कोटी रुपये जमा आहेत. त्याचबरोबर बँकेकडून कर्ज घेणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. बँकेचे एकूण कर्ज 15 टक्क्यांनी वाढून 37,67,535 कोटी रुपये झाले आहे. यामध्ये बँकेने सुमारे 7,25,818 कोटी रुपये गृहकर्ज म्हणून वितरित केले आहेत.