भारत देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. याचवेळी देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने ग्राहकांना जोरदार धक्का दिला आहे. कर्जावरील व्याजदर वाढविण्याची घोषणा केली असून यामुळे ईएमआयचे हप्ते वाढणार आहेत. याचबरोबर ठेवीदारांना फायदा होण्याची शक्यता आहे.
कर्ज घेणाऱ्या लोकांना आता व्याजदराच्या रूपात अधिक कर्जाची परतफेड करावी लागणार आहे. किरकोळ कर्जाच्या दृष्टिकोनातून एक वर्षाचा MCLR महत्त्वाचा मानला जातो, कारण गृहकर्जासारखी बँकेची दीर्घकालीन कर्जे या दराशी जोडलेली असतात. स्टेट बँकेने MCLR दर आज रात्रीपासून तीन महिन्यांपर्यंत 7.15 टक्क्यांवरून 7.35 टक्के केला आहे. गेल्या महिन्यात SBI ने विविध कालावधींसाठीच्या निधी आधारित कर्जावरील व्याज दरांमध्ये 10 बेसिस पॉईंटची किरकोळ वाढ केली होती.
रिझव्र्ह बँकेने या महिन्यात रेपो दरात ५० बेसिस पॉईंट्सने वाढ केली होती. यामुळे अनेक बँकांनी कर्जदारांवरील विविध कर्जदरात वाढ केली होती. परंतू एसबीआयने ही वाठढ केली नव्हती. एसबीआयने गेल्या आठवड्यात रिटेल मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजदरात वाढ केली होती. सध्या बँक सर्वसामान्यांना 2.90% ते 5.65% व्याज देत आहे आणि 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 3.40% ते 6.45% व्याज देत आहे.