Startups Seed Funding : तिसऱ्यांदा सत्तेत आलेल्या मोदी सरकारने पुन्हा एकदा नवउद्योजक घडवण्यासाठी मोहिम हाती घेतली आहे. देशातील अर्थव्यवस्था पुढे नेण्यासाठी छोट्या उद्योगांची गरज वाढली आहे. अशा परिस्थितीत स्टार्टअपची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. आजच्या अनेक तरुणांना स्टार्टअप्स सुरू करायचे आहेत. पण भांडवल कसे उभारावे यातच त्यांची शक्ती जाते. तुम्ही जर यापैकीच एक असाल तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. अशा स्थितीत केंद्र सरकारच्या योजनेतून स्टार्टअपसाठी सोप्या प्रक्रियेद्वारे सीड फंडिंग मिळू शकते.
प्रितेश लखानी नावाच्या एका युजरने या संदर्भात सविस्तर माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केली आहे. स्टार्टअपसाठी सरकारकडून कर्ज कसे मिळाले? हे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितले आहे. त्यांना ५ टक्के वार्षिक व्याजदराने ३० लाख रुपयांचे कर्ज मिळाले आहे. याचा अर्थ दर महिन्याला अर्ध्या टक्क्यांपेक्षा कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध झाले आहे.
फक्त ५% व्याजाने ५० लाखांचे कर्ज घ्या
नवउद्योजकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप इंडिया हे मिशन सुरू केलं होतं. स्टार्टअपसाठी, कोणताही तरुण उद्योजक सरकारकडून ५० लाख रुपयांपर्यंतचा निधी मिळवू शकतो. स्टार्टअप इंडिया योजनेंतर्गत, सरकारकडून सीड फंडिंग स्वरूपात उद्योगासाठी सुरुवातीचे भांडवल दिले जाते. यामध्ये ५० लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध आहे. विशेष म्हणजे हे कर्ज अवघ्या ५ टक्के वार्षिक व्याजावर उपलब्ध आहे. म्हणजेच ५० लाखांच्या कर्जावर तुम्हाला वार्षिक फक्त २.५ लाख रुपये व्याज भरावे लागते.
स्टार्टअप्सना सीड फंडिंग कसे मिळते?
स्टार्टअप्सना सीड फंडिंग मिळण्यासाठी, तो डीपीआयआयटी प्रमाणित असणे आवश्यक आहे. स्टार्टअप इंडिया वेबसाइटला भेट देऊन तुम्ही याची नोंदणी करा. त्यानंतर अर्ज भरुन सबमिट करावा लागतो. डीपीआयआयटी प्रमाणपत्र मिळण्यासाठी काही महिने लागू शकतात. DPIIT प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय सीड फंडिंग मिळत नाही. डीपीआयआयटी प्रमाणपत्र प्राप्त मिळाल्यानंतर स्टार्टअप इंडिया वेबसाइटच्या सीडफंड पोर्टलवर कर्जासाठी अर्ज करावा लागतो.
डीपीआयआयटी म्हणजे काय?
डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड (DPIIT) हा देशातील वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचा एक विभाग आहे. DPIIT या विभागाच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर व्यवसायांना विविध योजनांतर्गत कर्ज मिळवूण देण्यासाठी प्रयत्न केला जातो.