देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) कोट्यवधी ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. बँकेने ज्येष्ठ नागरिक ग्राहकांसाठीच्या 'SBI WECARE' या विशेष मुदत ठेव (FD) योजनेचा कालावधी पुन्हा एकदा वाढविला आहे. अर्थात, आता ग्राहक या योजनेत 30 जूनपर्यंत गुंतवणूक करून मोठा नफा मिळवू शकतात. ही योजना बँकेने मे 2020 मध्ये सुरू केली होती.
या योजनेअंतर्गत मिळेल 7.50 टक्के व्याज - वरिष्ठ नागरीक ग्राहक या विशेष योजनेत 5 वर्ष ते 10 वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. एसबीआयच्या ऑफिशिअल वेबसाईटनुसार, या योजनेंतर्गत बँक आपल्या ग्राहकांना कार्ड रेटने अॅडिशनल 100 बेसिस पॉइंट एवढे व्याज देते. या योजनेंतर्गत एफडी करणाऱ्या ग्राहकांना 7.50 टक्के एवढे व्याज मिळेल.
येथे मिळतो 7.90 टक्के परतावा - दुसरीकडे बँक आपल्या ग्राहकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या एफडीवर 3.50 टक्के ते 7.50 टक्के एवढे व्याज देते. याशिवाय, बँक ‘SBI Sarvottam’ एफडी योजनेंतर्गत 1 वर्षांच्या एफडीवर आपल्या सर्वसामान्य ग्राहकांना 7.10 टक्के तर वरिष्ठ नागरिक ग्राकांना 7.55 टक्के व्याज देत आहे. तसेच, याच योजनेंतर्गत 2 वर्षांच्या एफडीवर आपल्या सर्वसामान्य ग्राहकांना 7.40 टक्के, तर आपल्या वरिष्ठ नागरिक ग्राहकांना 7.90 टक्के व्याज देत आहे.