मुंबई: गेल्या अनेक महिन्यांपासून रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात वाढ केल्याचे पाहायला मिळत आहे. यानंतर अनेक बँकांनी कर्जाचे व्याजदर वाढवून ग्राहकांना धक्का दिला आहे. मात्र, यातच काही प्रमुख बँकांनी मुदत ठेवींवरील व्याजदर वाढवून ग्राहकांना सुखद धक्का दिला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियासह देशातील तीन प्रमुख बँकांनी ग्राहकांच्या ठेवींवर म्हणजेच मुदत ठेवींवरील व्याज दरात वाढ केली आहे. ही वाढ वेगवेगळ्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. याचा लाभ बँकेत जमा करून व्याजाद्वारे नफा कमावणाऱ्या ग्राहकांना मिळणार आहे.
खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेने २ कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर व्याजदर वाढवले आहेत. बँकेने ठेवींच्या दरात ०.४५ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. बँकेने १७ महिने ते १८ महिन्यांच्या कालावधीसाठी एफडीच्या व्याजदरात ४५ बेस पॉइंट्सची वाढ केली आहे. आता नवीन दर ५.६० टक्क्यांवरून ६.०५ टक्के करण्यात आले आहेत. हे दर ११ ऑगस्टपासून लागू झाले आहेत. यापूर्वी १६ जुलै रोजी बँकेने एफडीवरील व्याजदरात वाढ केली होती.
स्टेट बँकेकडूनही मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ
देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) २ कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने वेगवेगळ्या कालावधीसाठी व्याजदरात १५ बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. आता सामान्य गुंतवणूकदारांना मुदत ठेवींवर २.९० टक्के ते ५.६५ टक्के दराने व्याज मिळेल. तर, ज्येष्ठ नागरिकांसाठी ७ दिवस ते १० वर्षांपर्यंतच्या ठेवी ३.४० टक्के ते ६.४५ टक्के पर्यंत आहेत.
दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाने २ कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार बँक आता २.७५ टक्के ते ५.५५ टक्के पर्यंत व्याजदर आकारत आहे. हे ७ दिवसांपासून ते ५५५ दिवसांच्या मुदतीच्या ठेवींसाठी आहे. अलीकडेच देशातील वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केली आहे. सध्या रेपो दरात अर्ध्या टक्क्याने वाढ केली, ज्यामुळे रेपो दर वाढून ५.४० टक्के झाला आहे. याआधीही मे आणि जून महिन्यात आरबीआयने रेपो दरात दोनदा वाढ केली आहे.