नवी दिल्ली - केंद्र सरकारने मंगळवारी स्वामीनाथन जानकीरमन यांना भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी बढती दिली आहे. नियुक्तीच्या तारखेपासून पुढील ३ वर्षांपर्यंत ते आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर असणार आहेत. स्वामीनाथन हे सध्या भारतीय स्टेट बँकेचे एमडी म्हणजे व्यवस्थापकीय संचालक आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या डेप्युटी गव्हर्नरपदी सध्या महेश कुमार जैन असून त्यांचा कार्यकाळ २२ जून रोजी समाप्त होत आहे.
महेश कुमार जैन यांना जून २०१८ मध्ये या पदावर नियुक्त करण्यात आलं होतं. मात्र, जून २०२१ मध्ये पुन्हा एकदा त्यांचा कार्यकाळ २ वर्षांसाठी वाढविण्यात आला होता. जैन हे पर्यवेक्षण, वित्तीय समावेशन आणि विकास, ग्राहक शिक्षण आणि संरक्षण विभागाचे प्रभारी आहेत. आता, या सर्वच पदांची जबाबदारी स्वामीनाथन जानकीरमन यांच्याकडे आली आहे.
केंद्र सरकारने १ जून रोजी आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नर पदासाठी मुलाखती घेतल्या होत्या. या पदासाठी ज्यांची मुलाखत घेण्यात आली, त्यामध्ये, यूनियन बँकेचे अध्यक्ष श्रीनिवासन वरदराजन, बँक ऑफ महाराष्ट्राचे प्रबंध निदेशक आणि सीईओ एएस राजीव, यूको बँकेचे एमडी आणि सीईओ सोमा शंकर प्रसाद यांचा समावेश होता. माहितीगार लोकांच्या म्हणण्यानुसार, इंडियन बँकेचे एमडी आणि सीईओ एस. एल. जैन व स्टेट बँक ऑफ इंडियाचे मैनेजिंग डायरेक्टर स्वामीनाथन हेही या मुलाखतीसाठी सहभागी होते.
आरबीायचे गव्हर्नर शक्तिकांत दास, कॅबिनेट सचिव, वित्तीय सेवा सचिव आणि मुख्य आर्थिक सल्लागार असलेल्या एका पॅनेलने उमेदवारांची मुलाखत घेतली होती. सुत्रांच्या माहितीनुसार, सरकारने 19 मार्च रोजी आरबीआईच्या डिप्टी गवर्नर पदासाठी अर्ज मागवले होते. इच्छुक उम्मीदवारांना 10 एप्रिलपर्यंत फाइनेंशियल सर्विस डिपार्टमेंटमध्ये अर्ज करणे आवश्यक होते.