Personal Loan : आजारपण, अपघात किंवा अचानक उद्भवलेल्या आर्थिक संकटात कुणालाही पैशांची गरज भासू शकते. जर तुमच्याकडे बचत किंवा आपत्कालीन निधी नसेल तर तुम्हाला कर्ज घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. आजकाल बँका त्यांच्या ग्राहकांना प्री-अप्रूव्ह कर्जे देतात. यामुळे ग्राहकांना काही मिनिटांत लोन मिळू शकते. मात्र, पर्सनल लोन हे सर्वाधिक व्याजदर असलेले कर्ज आहे. हे तुम्हाला खूप महागात पडू शकते. अशा परिस्थिती तुम्ही वैयक्तिक कर्जाऐवजी ओव्हरड्राफ्ट सुविधा देखील घेऊ शकता. बँका त्यांच्या ग्राहकांना ओव्हरड्राफ्ट ऑफर करतात.
ओव्हरड्राफ्ट सुविधा काय आहे?
खाजगी किंवा सरकारी दोन्ही बँकांमध्ये ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध आहे. बऱ्याच बँका चालू खाते, पगार खाते आणि मुदत ठेवींवर ओव्हरड्राफ्ट सुविधा देतात, जेणेकरून ग्राहक आवश्यकतेनुसार रोख वापरू शकतात. हे एक प्रकारचे कर्ज आहे, जे तुमचे खाते असलेल्या बँकेतून मिळते. अनेक बँका त्यांच्या खातेदारांना शेअर्स, बाँड्स आणि विमा पॉलिसींच्या बदल्यात ओव्हरड्राफ्ट सुविधा देतात. ओव्हरड्राफ्टच्या सुविधेमुळे तुम्ही गरज असेल तेव्हा बँकेतून पैसे घेऊ शकता आणि नंतर परत करू शकता.
ओव्हरड्राफ्ट कसे घ्यायचे?
काही ग्राहकांना आधीच ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळते तर काहींना नंतर बँकेकडून मंजुरी घ्यावी लागते. ग्राहक या सुविधेसाठी ऑनलाइन किंवा बँकेला प्रत्यक्ष भेट देऊन अर्ज करू शकतात. काही बँका सुरुवातीला ग्राहकांकडून प्रक्रिया शुल्कही आकारतात. ओव्हरड्राफ्ट सुविधा सिक्योर्ड आणि अनसिक्योर्ड अशा २ प्रकारची असते. सिक्योर्ड सुविधा म्हणजे सिक्युरिटी म्हणून पैसे घेण्यापूर्वी, तुम्ही शेअर्स, बाँड्स, एफडी, घर, विमा पॉलिसी किंवा पगार गहाण ठेवून बँकेकडून ओव्हरड्राफ्ट सुविधा घेऊ शकता. तर अनसिक्योर्ड ओव्हरड्राफ्ट सुविधेत आपल्याकडे तारण ठेवण्यासाठी काहीही नसताना बँक आपल्याला कर्ज देते.
ओव्हरड्राफ्ट किती कर्ज मिळते?
यासाठी प्रत्येक बँकेचे वेगवेगळे नियम आहेत. तुम्ही बँकेकडे काय तारण ठेवता यावर ते पूर्णपणे अवलंबून आहे. बहुतेक बँका पगार आणि एफडीच्या बदल्यात ओव्हरड्राफ्ट सुविधा घेण्यासाठी जास्त पैसे देतात आणि मर्यादाही जास्त ठेवतात. तुमची पेमेंट हिस्ट्री चांगली असल्यास बँका तुम्हाला तुमच्या पगाराच्या २ ते ३ पट ओव्हरड्राफ्टमध्ये देतात.
कमी व्याजदर
ओव्हरड्राफ्टद्वारे पैसे घेणे कोणत्याही क्रेडिट कार्ड किंवा वैयक्तिक कर्जापेक्षा स्वस्त आहे. ओव्हरड्राफ्टमध्ये, तुम्ही इतर कर्जांपेक्षा कमी व्याजदरात पैसे वापरायला मिळतात. तसेच, ज्या कालावधीसाठी पैसे घेतले आहेत, त्या कालावधीसाठीच कर्ज घेतलेल्या पैशावर व्याज द्यावे लागते.