Join us

पैसे न्या, बॅंक तुम्हाला शोधतेय; ३५ हजार कोटींची रक्कम बेवारस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 4:11 AM

देशभरातील बॅंकांमध्ये अशी अनेक खाती आहेत, ज्यांमधील पैशांवर काेणीही दावा केलेला नाही.

 

    नवी दिल्ली : देशभरातील बॅंकांमध्ये अशी अनेक खाती आहेत, ज्यांमधील पैशांवर काेणीही दावा केलेला नाही. या खात्यांमध्ये गेल्या दहा वर्षांपासून एकही व्यवहार झालेला नाही. या खात्यांमध्ये तब्बल ३५ हजार काेटी रुपये अनक्लेम्ड किंवा बेवारस पडलेले आहेत. या पैशांवर काेणीही दावा केलेला नाही. त्यात तुमचेही पैसे असतील, तर तुम्हाला ते परत मिळू शकतात. यासाठी १ जूनपासून आरबीआय विशेष माेहीम राबविणार आहे. आरबीआय ‘१०० डेज, १०० पेज’ या नावाने माेहीम राबविणार आहे. याअंतर्गत बॅंका आपल्या शाखांमध्ये किमान १०० रुपयांपेक्षा जास्त दावा न केलेली रक्कम असलेली खाती शाेधणार आहे. हे खातेदार किंवा नाॅमिनीचा शाेध घेऊन त्यांना रक्कम परत करतील. 

    १०.२४ कोटी खात्यांमध्ये ३५ हजार कोटींची रक्कमआरबीआयसमाेर बॅंकांमध्ये पडलेल्या बेवारस रकमेचा माेठा प्रश्न हाेता. अनक्लेम्ड खात्यांमधील रक्कम बॅंकांना आरबीआयच्या डिपाॅझिटर एज्युकेशन ॲण्ड अवेअरनेस फंडमध्ये जमा करावी लागते. आरबीआयने फेब्रुवारीमध्ये काेणीही दावा न केलेले ३५ हजार रुपये बॅंकांना परत केले हाेते. 

    काेणती आहेत अनक्लेम्ड खाती? बचत खाते, चालू खाते ज्यांमध्ये गेल्या १० वर्षांमध्ये एकही व्यवहार झालेला नाही.मुदत ठेव, रिकरिंग डिपाॅझिट खाते, ज्यांची मुदत पूर्ण झाल्यानंतरही काेणीही दावा केलेला नाही.

    ही काळजी घ्या... आवश्यक नसलेली खाती बंद करा. गरजेपुरती १-२ खाती चालू ठेवा.तुमची बॅंक खाती, गुंतवणूक, विमा, इत्यादींची माहिती लिहून ठेवा. सर्व खात्यांमध्ये नामांकन प्रक्रिया आवर्जून करून घ्या.सर्व खात्यांची माहिती कुटुंबीयांना द्या.वेळाेवेळी केवायसी प्रक्रियेचे पालन करा. मुदत ठेव याेजनेच्या पावत्या जपून ठेवा.वर्षभरात बॅंक खात्यांमध्ये किमान एकदा व्यवहार करा.

    • अशी परत मिळवा रक्कम
    • गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेले बॅंक खाते, एफडी किंवा आरडी असेल तर ती रक्कम परत मिळविण्याची सुवर्णसंधी आहे. 
    • सर्वप्रथम बॅंकेकडून अशा खात्यांची यादी तपासून पाहावी लागेल.
    • संबंधित बॅंकेच्या वेबसाईटवर जाऊन यादी पाहता येईल
    • यादीत तुमचे किंवा नातेवाइकाचे नाव असल्यास त्या बॅंकेच्या जवळच्या शाखेत जावे. नामांकनाचे किंवा वारसदार असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागेल.
    • केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रे साेबत न्यावी लागतील. ती जाेडून दाव्याचा अर्ज भरावा लागेल. 
    • खातेदाराचा मृत्यू झाला असल्यास आणि नामांकन केलेले नसल्यास किंवा नामांकित व्यक्तीचाही मृत्यू झालेला असल्यास त्यांचे वारस दावा करू शकतात. मृत्यू प्रमाणपत्र किंवा प्राेबेट प्रमाणपत्र द्यावे लागेल.
    • दाव्याची रक्कम जास्त असल्यास बॅंक इन्डेम्निटी आणि कुटुंबीयांकडून ना हरकत प्रमाणपत्र मागू शकते.
    • सर्व कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर पैसे मिळतील.
    टॅग्स :बँकपैसा