देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयचा शेअर वर्षभरातील सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. बँकेच्या शेअरमध्ये सातत्याने वाढ सुरू आहे. आता या मागचे कारण काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. खरं तर, SBI च्या रिटेल लोन व्यवसायाने 5 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. बँकेने नोव्हेंबर 2022 अखेर हा आकडा गाठला आहे. बँकेसाठी ही देखील एक मोठी उपलब्धी आहे, कारण केवळ 12 महिन्यांच्या कालावधीत बँकेने त्यात एक लाख कोटी रुपये जोडले आहेत.
जानेवारी 2015 मध्ये बँकेने प्रथम रिटेल लोन व्यवसायात 1 लाख कोटी रुपयांचा आकडा गाठला होता. बँकेच्या रिटेल बिझनेसचा व्यवसाय जानेवारी 2018 मध्ये 2 लाख कोटी रुपयांवर पोहोचला होता. यानंतर, कोरोनाची महासाथ असतानाही ऑगस्ट 2020 मध्ये तो तीन लाख कोटींच्यावर पोहोचला होता. यानंतर बँकेच्या रिटेल लोन व्यवसायाने गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये चार लाख कोटींची पातळी गाठली. 12 महिन्यांत एसबीआयने आता पाच लाख कोटी रुपयांचा आकडा गाठला आहे.
बँकेने काय म्हटलेय?
SBI चे अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले की SBI ने आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे हे जाहीर करताना मला आनंद होत आहे. बँकेला नेहमीच उद्योगासाठी एक बेंचमार्क सेट करायचा आहे. आमच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि ही वाढ साध्य करण्यात मोठी भूमिका बजावल्याबद्दल आम्ही आमचे ग्राहक आणि भागधारकांचे अत्यंत आभारी आहोत, असेही ते म्हणाले.