लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने फास्टॅग युजर्ससाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बँकांच्या यादीतून पेटीएम पेमेंट बँकेला वगळले आहे. त्यामुळे या बँकेचे फास्टॅग असलेल्या वाहनधारकांना इतर बँकेचे फास्टॅग घ्यावे लागतील. जवळपास २ कोटी वाहनधारकांना याचा फटका बसणार आहे. युजर्सना पेटीएमचे फास्टॅग परत करून इतर बँकांकडून खरेदी करावे लागतील. अनेक बँकांनी फास्टॅग बदलून घेण्याची (पोर्टिंग) सुविधा दिली आहे.
अन्य कोणत्या बँकांचे पर्याय?
वाहनधारकांना आता एअरटेल पेमेंट बँक, अलाहाबाद बँक, एयू स्मॉल फायन्सान बँक, ॲक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, सिटी युनियन बँक, कॉसमॉस बँक, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक, फेडरल बँक, फिनो पेमेंट्स बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, आयडीबीआय बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, इंडियन बँक, इंडसइंड बँक, जे अँड के बँक, कर्नाटक बँक, करुर वैश्य बँक, कोटक महिंद्रा बँक, नागपूर सहकारी बँक, पंजाब नॅशनल बँक, सारस्वत बँक, साऊथ इंडियन बँक, भारतीय स्टेट बँक, त्रिशूला जिल्हा सहकारी बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि येस बँकेकडून फास्टॅग घेता येतील.
सेवा १५ मार्चपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा
आर्थिक अनियमिततेचा ठपका ठेवत आरबीआयने पेटीएमवर ग्राहकाच्या खात्यात, प्रीपेड सेवा, वॉलेट, फास्टॅगसाठी २९ फेब्रुवारी २०२४ नंतर ठेव घेणे, टॉप अप घेणे तसेच व्यवहारांना बंदी घालण्याचा निर्णय ३१ जानेवारी रोजी दिला होता. आरबीआयने ही मुदत १५ दिवसांनी म्हणजेच १५ मार्चपर्यंत वाढविली.
व्यापाऱ्यांना पर्यायी व्यवस्था उभारण्यासाठी असता आणखी वेळ लागू शकतो, असे आरबीआयने म्हटले आहे. ग्राहकांना पैसे काढून घेण्यात अडचणी येऊ नयेत, असे स्पष्ट करीत लोकांचा संभ्रम दूर करण्यासाठी आरबीआयने शुक्रवारी सतत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी (एफएक्यू) शुक्रवारी जारी केली आहे.
———————