Join us  

कर्ज घेण्याच्या विचारात आहात, मग आधी जाणून घ्या सिबिल स्कोअर किती लागतो?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 9:35 AM

क्रेडिट इन्फर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेडच्या सदस्य बँका प्रत्येक महिन्याला कर्जदाराची संपूर्ण माहिती सिबिलला सादर करतात आणि त्यावर आधारित हा अहवाल तयार केला जातो. 

सिबिल स्कोअर किंवा अहवाल हा ‘क्रेडिट इन्फर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड’द्वारा व्यक्तीच्या वित्तीय डेटावर म्हणजेच बँकेतील व्यवहारांवर तसेच आजवर घेतलेल्या कर्ज परतफेडीच्या व्यवहारांवर आधारित तयार केला जातो. या डेटामध्ये आपली देयके म्हणजेच कर्ज आणि क्रेडिट कार्डचे रेकॉर्ड समाविष्ट केले जातात. क्रेडिट इन्फर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेडच्या सदस्य बँका प्रत्येक महिन्याला कर्जदाराची संपूर्ण माहिती सिबिलला सादर करतात आणि त्यावर आधारित हा अहवाल तयार केला जातो. 

बँका तसेच वित्तीय संस्था सिबिल स्कोअर पाहून मगच कर्जदाराची कर्ज घेण्याची पात्रता ठरवितात, म्हणजेच सिबिल स्कोअर संख्या व्यक्तीच्या क्रेडिट पात्रतेचे प्रतिनिधित्व करते. सिबिलमधील उत्तम स्कोअर हा चांगला क्रेडिट इतिहास आणि जबाबदार कर्जाच्या परतफेडीचे वर्तन सूचित करतो आणि म्हणूनच कर्ज मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये सिबिल स्कोअर अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो.

७०० ते ७५० मधील क्रेडिट स्कोअर आदर्शसाधारणपणे, असुरक्षित व्यवसाय कर्जाचा लाभ घेण्यासाठी, तुमच्या कंपनीचा क्रेडिट अहवाल अत्यंत महत्त्वाचा ठरतो. जर तुम्हाला कंपनीच्या मालमत्तेमध्ये कोणतीही इक्विटी अथवा स्थावर मालमत्ता गहाण ठेवायची नसेल तर क्रेडिट स्कोअर ७५० पेक्षा अधिक असणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे जर व्यावसायिकाला सुरक्षित व्यवसाय कर्ज घ्यायचे असल्यास  म्हणजेच स्थावर मालमत्ता गहाण ठेवून कर्ज घ्यायचे असल्यास ७०० ते ७५० मधील क्रेडिट स्कोअर आदर्श मानला जातो.

    सिबिल स्कोअर जितका जास्त असेल तितकी कर्जमंजुरीची शक्यताही अधिक असते. सिबिल स्कोअर हा ३०० ते ९०० गुणांदरम्यान असतो आणि ७५०पेक्षा अधिक गुण हे सामान्यतः चांगला स्कोअर म्हणून ओळखला जातो.     सिबिल स्कोअर जर ७५०हून अधिक असल्यास, अशा कर्जदारांना सर्वोत्कृष्ट व्याजदरांसह कर्ज आणि क्रेडिट कार्ड उपलब्ध केले जाते.

कंपनी क्रेडिट रिपोर्ट म्हणजे नेमके काय?कंपनीचा क्रेडिट रिपोर्ट हा कंपनीचे आर्थिक आरोग्य प्रतिबिंबित करतो. ज्यामध्ये मुखत्वे पुढील मुद्दे आढळतात. 

  • कंपनीचा तपशील या विभागात कॉर्पोरेट घटकांची पार्श्वभूमी जसे : कंपनीचे स्थापना वर्ष, कंपनीचे भांडवल, मालकांचे, कंपनीच्या डायरेक्टर्सचे  वैयक्तिक तपशील इ. नमूद केले जातात. 
  • कंपनीचे कर्ज परतफेड रेकॉर्ड : या विभागात कंपनीने आपली व्यावसायिक कर्जे किती चांगल्या प्रकारे फेडली आहेत तसेच व्यावसायिक कर्जाची नियमित परतफेड केली आहे. बँका या विभागावर अधिक भर देतात. 
  • कंपनीचा मागील क्रेडिट अर्ज : मागील क्रेडिट अर्जांची वारंवारता देखील बँक तपासू शकते. लोन ॲप्लिकेशनची  वारंवारता खूप जास्त प्रमाणात असल्यास, हे स्पष्टपणे सूचित करते की, स्थिर रोख प्रवाहाच्या कमतरतेमुळे व्यावसायिक आधी कर्ज घेऊ शकला नाही आणि म्हणूनच अधिक सतर्क राहणे योग्य ठरते.

प्रतीक कानिटकर, चार्टर्ड सेक्रेटरी

टॅग्स :पैसाबँकिंग क्षेत्र