लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : येणाऱ्या काळात लाभार्थीस न जोडताच त्याच्या बँक खात्यात दुसऱ्या बँक खात्यातून ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम पाठवता येणार आहे.
भारतीय राष्ट्रीय भुगतान महामंडळ (एनपीसीआय) लवकरच ही सुविधा आणणार आहे. त्यासाठी ‘आयएमपीएस’ला अधिक सुलभ करण्यात आले आहे. ही सेवा २४ तास सुरू असते, हे विशेष. बँकांनी अजून ही सुविधा सुरू केलेली नाही. मात्र, लवकरच ती सुरू करण्यात येणार आहे.
माेबाइल क्रमांक टाका, क्षणात पैसे पाठवा
नव्या सुविधेत आयएमपीएस वापरकर्ते मोबाइल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंग यांसारख्या बँकिंग चॅनल्सवर केवळ मोबाइल क्रमांक आणि बँकेचे नाव टाकून पैशांची देवाण-घेवाण करू शकतील.
आयएमपीएसच्या २ पद्धती काेणत्या?
पहिल्या पद्धतीत बँक खाते क्रमांक, बँकेचे नाव आणि आयएफएससी कोड यांचा वापर होतो. यासाठी लाभार्थी जाेडावा लागताे. त्यानंतर काही वेळाने पैसे पाठविता येतात.
दुसऱ्या पद्धतीत लाभार्थींचा मोबाइल क्रमांक आणि मोबाइल मनी आयडेंटिफायर (एमएमआयडी) यांचा वापर होतो. एमएमआयडी हा ७ अंकी क्रमांक असतो. बँक ग्राहकांना तो देते.
कॉर्पोरेट क्षेत्रापर्यंत करता येईल विस्तार
नवी व्यवस्था घाऊक व किरकोळ देवघेवीपासून अगदी कॉर्पोरेट क्षेत्रापर्यंत विस्तारित करता येऊ शकते. या सुविधेत पैसे पाठविणाऱ्यास बँकेच्या रेकॉर्डमध्ये नावाची दुसऱ्यांदा पडताळणी करण्यास मदत मिळेल. पैसे योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचत आहेत,
हे यातून निश्चित होईल. पैसे पाठविण्याआधी लाभार्थीचे नाव प्रेषकास पाहता येईल.