UCO Bank CBI Raid : सार्वजनिक क्षेत्रातील UCO बँकेबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. संशयास्पद IMPS व्यवहार प्रकरणी केंद्रीय तपास संस्थेने (CBI) दोन राज्यांतील 67 ठिकाणी छापे टाकले. मिळालेल्या माहितीनुसार, हे संशयास्पद व्यवहार 800 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे आहेत. छाप्यादरम्यान सीबीआयने या ठिकाणांहून अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर 2023 मध्ये या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती.
राजस्थान आणि महाराष्ट्रात छापे
सीबीआयने बुधवारी राजस्थान आणि महाराष्ट्रात हे छापे टाकले. 820 कोटी रुपयांच्या संशयास्पद IMPS व्यवहारांबाबत छाप्यादरम्यान UCO बँक आणि IDFC शी संबंधित सुमारे 130 कागदपत्रांसह 43 डिजिटल उपकरणेही जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये 40 मोबाईल फोन, 2 हार्ड डिस्क आणि 1 इंटरनेट डोंगलसह इतर गोष्टींचा समावेश आहे. युको बँकेच्या वेगवेगळ्या खात्यांमधून हे व्यवहार झाले.
CBI has conducted further search operations at 67 locations in seven cities of Rajasthan and Maharashtra in connection with a case related to suspicious IMPS (Immediate Payment Service) transactions amounting to approximately Rs. 820 crores across multiple UCO Bank accounts.…
— ANI (@ANI) March 7, 2024
अशाप्रकारे हा घोटाळा झाला
UCO बँकेतील हे संशयास्पद IMPS व्यवहार 10 नोव्हेंबर 2023 ते 13 नोव्हेंबर 2023 दरम्यान झाले. 7 खाजगी बँकांच्या 14,600 खातेदारांनी UCO बँकेच्या 41,000 खातेदारांच्या खात्यात चुकीच्या पद्धतीने IMPS व्यवहार केले. या प्रकरणात मूळ खात्यातून एकही पैसा डेबिट झाला नाही, परंतु युको बँकेच्या 41,000 खात्यांमध्ये एकूण 820 कोटी रुपये जमा झाले. यापैकी बहुतांश खातेदारांनी वेगवेगळ्या बँकिंग चॅनेलद्वारे बँकेतून पैसे काढले.
CBIने डिसेंबरमध्ये छापेमारी केली
यापूर्वी या प्रकरणाच्या तपासादरम्यान सीबीआयने डिसेंबर 2023 मध्येही अनेक ठिकाणी छापे टाकले होते. त्यानंतर कोलकाता आणि मंगळुरुमध्ये खासगी बँकधारक आणि युको बँकेच्या अधिकाऱ्यांच्या 13 ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. याच क्रमाने 6 मार्च 2024 रोजी सीबीआयने राजस्थान आणि महाराष्ट्रातील जोधपूर, जयपूर, जालोर, नागपूर, बारमेर, फलोदी आणि पुणे येथे छापे टाकले. या छाप्यांमध्ये युको बँक आणि आयडीएफसी बँकेशी संबंधित 130 संशयास्पद कागदपत्रे आणि 43 डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली असून ती फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत. सीबीआयने घटनास्थळी आणखी 30 संशयितांची चौकशी केली आहे.
युको बँकेच्या शेअर्सवर परिणाम
सीबीआयच्या छापेमारीनंतर या सरकारी बँकेच्या शेअर्सवर परिणाम झाला. गुरुवारी युको बँकेचे शेअर्स व्यवहाराच्या सुरुवातीला 58.90 रुपयांवर उघडले आणि बाजार बंद असताना 2.48 टक्क्यांच्या घसरणीसह 57.10 रुपयांवर बंद झाले. या बँकिंग शेअरची सर्वकालीन उच्चांक 70.65 रुपये आणि निच्चांक 22.25 रुपये आहे.
(टीप- शेअर बाजारात कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मार्केट तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)