Udgam Portal: उद्गम पोर्टलमध्ये आता ३० बँका जोडल्या गेल्याची माहिती रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आली. दावा न केलेल्या रकमेची माहिती या पोर्टलद्वारे दिली जाते. यामुळे लोकांना दावा न केलेली रक्कम शोधून त्यावर दावा करण्यात मदत होते. रिझर्व्ह बंकेनं १७ ऑगस्ट रोजी Udgam (अनक्लेम डिपॉझिट्स - गेटवे टू ऍक्सेस इन्फॉर्मेशन) पोर्टल लाँच केले होते. त्याचा उद्देश अनेक बँकांमध्ये दावा न केलेल्या ठेवी एकाच ठिकाणी शोधण्याची सुविधा देणे हा आहे.सुरुवातीला सात बँकांसह ही सुविधा सुरू करण्यात आली होती. त्यावेळी रिझर्व्ह बँकेनं १५ ऑक्टोबरपर्यंत टप्प्याटप्प्यानं आणखी बँकांचा समावेश केला जाईल, असं सांगितलं होतं. “२८ सप्टेंबर २०२३ रोजी पोर्टलवर ३० बँकांशी संबंधित माहितीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता (DEA) फंडातील दावा न करण्यात आलेल्या रकमेच्या सुमारे ९० टक्के कव्हर केलं जातं," अस रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय.कोणत्या बँकांचा समावेश३० बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक आणि बँक ऑफ इंडिया सारख्या सर्व प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा समावेश आहे. याशिवाय सिटी बँक, स्टँडर्ड चार्टर्ड आणि एचएसबीसी या विदेशी बँका आणि खासगी क्षेत्रातील बँकांमध्ये एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि अॅक्सिस बँक यांचा समावेश आहे.हे वेब पोर्टल लोकांना दावा न केलेली रक्कम/खात्यांबद्दल माहिती मिळवण्यास आणि ठेवींवर दावा करण्यास किंवा संबंधित बँकांमध्ये त्यांची ठेवींची खाती सक्रिय करण्यासाठी तयार केलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, इंडियन फायनान्शिअल टेक्नॉलॉजी आणि अलाईड सर्व्हिसेस आणि सहभागी बँकांनी हे पोर्टल विकसित केलंय.
RBI च्या पोर्टलशी जोडल्या गेल्या ३० बँका, सहज मिळणार अनक्लेम्ड डिपॉझिट; तुमची बँक आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2023 11:09 AM