Join us  

क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी ५ मोलाच्या टिप्स; वायफळ खर्च टळेल, टेन्शनही होईल कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 10:55 PM

सध्या ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत आपणही त्याला बळी पडू नये, म्हणून काही विशेष खबरदारी घेणे खूप गरजेचे आहे.

 

क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ऑनलाईन शॉपिंग पोर्टल्सवर क्रेडिट कार्ड वापरून खरेदी करणं अधिक फायद्याचं ठरतं, बऱ्याच सवलती मिळतात, त्यामुळे तरुणाई क्रेडिट कार्डला पसंती देतेय. एखादी वस्तू घ्यायचीय, पण खात्यात तेवढी रक्कम नाहीए, अशावेळी क्रेडिट कार्ड हा उत्तम पर्याय ठरतो. मात्र, सध्या ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये झालेली वाढ लक्षात घेता, क्रेडिट कार्ड वापरताना विशेष खबरदारी घेणे खूप गरजेचे आहे. अन्यथा, आपलं मोठे नुकसान होऊ शकतं. त्यामुळे खालील 5 गोष्टी कायम लक्षात ठेवा.

ट्रान्झॅक्शन लिमिट सेट करा

क्रेडिट कार्ड धारक आपल्या गरजेनुसार पॉइंट ऑफ सेल (POS) वर ट्रांजेक्शन लिमिट सेट करू शकतो. तुम्ही सर्वसाधारणपणे किती रुपयांपर्यंत खरेदी करता, याचा अंदाज घेऊन तेवढीच ट्रांजेक्शन लिमिट सेट करून ठेवा. म्हणजे, तुमचे क्रेडिट कार्ड दुसऱ्या कुणाच्या हाती लागलं तरी तुमचं मोठं नुकसान टळेल. ती व्यक्ती विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार करू शकणार नाही. तसंच, तुम्हीही खरेदी करताना वाहवत जाणार नाही.

क्रेडिट कार्ड वापरून रोख रक्कम काढू नका!

बँकेने ठरवून दिलेल्या मर्यादेपर्यंतची रोकड काढण्याची सुविधाही क्रेडिट कार्डवर दिली जाते, परंतु, या सुविधा शक्यतो वापरू नका. पैसे काढण्यासाठी क्रेडिट कार्डऐवजी डेबिट कार्ड वापरल्यास चांगले ठरू शकते. कारण, ज्या दिवशी तुम्ही क्रेडिट कार्डमधून पैसे काढता, त्या दिवशी त्यावर व्याजही जमा होऊ लागतं आणि तो खर्च फारच महाग पडू शकतो. अगदीच नाईलाज असेल तरच क्रेडिट कार्ड वापरून रोख रक्कम काढा, अन्यथा नकोच!

कॉन्टॅक्टलेस व्यवहार?... धोका ओळखा!

हल्ली बहुतेक बँका ग्राहकांना कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्ड देतात. पिन वगैरे टाकायची कटकट नको, म्हणून ग्राहकही ही कार्डं घेतात. ते नक्कीच सोयीचं आहे, पण त्यात धोकाही आहे. चुकून तुमचे कार्ड हरवलं आणि चुकीच्या हातात पडलं तर मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे हे फीचर बंद ठेवा किंवा आपलं क्रेडिट कार्ड खूपच काळजीपूर्वक हाताळा. 

आंतरराष्ट्रीय व्यवहार कशासाठी?

आवश्यकता नसल्यास कोणतेही आंतरराष्ट्रीय ई-कॉमर्स किंवा ऑनलाइन व्यवहार मर्यादित करणे किंवा निष्क्रिय करणे अधिक चांगले होईल. कारण बहुतेक आंतरराष्ट्रीय ऑनलाइन व्यवहार साधारणपणे OTP शिवाय पूर्ण होतात.

कार्डावरून खर्चाची मर्यादा मर्यादितच ठेवा!

क्रेडिट कार्ड कंपन्या कार्ड लिमिट वाढवण्यासाठी ग्राहकांना संदेश पाठवतात आणि युजर्सही ती वाढवत राहतात. काही जणांसाठी हा प्रेस्टिजचा विषय असतो. पण, खरंच आपल्याला तेवढ्या लिमिटची गरज आहे का, हे लक्षात घ्या आणि नसेल तर तेवढीच मर्यादा सेट करा. ती आवश्यकतेनुसार वाढवता येऊ शकेलच की!