Vijay Mallya News : किंगफिशर एअरलाइन्सचा मालक आणि कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून देशाबाहेर पळालेला विजय मल्ल्या सध्या न्यायाची भीक मागत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत फरारी विजय मल्ल्याने सरकारी तपास यंत्रणांवर निशाणा साधला आहे. कर्ज वसुली न्यायाधिकरणाने किंगफिशर एअरलाइन्सवर ६२०३ कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे सांगितले होते. ज्यामध्ये १२०० कोटी रुपयांच्या व्याजाचाही समावेश आहे. प्रत्यक्षात अर्थमंत्र्यांनी संसदेत माहिती दिली की ईडीच्या माध्यमातून ६२०३ रुपयांऐवजी १४१३१ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली. असे असतानाही मी आर्थिक गुन्हेगार आहे, अशी टीका मल्ल्याने केली.
उद्योगपती ललित मोदींचे मानले आभार
विजय मल्ल्या इथेच थांबला नाही. तर पुढे ललित मोदींना टॅग करत त्याने लिहिले, “धन्यवाद माझ्या प्रिय मित्रा… ज्या देशात आम्ही योगदान देण्याचा प्रयत्न केला, तिथे आमच्या दोघांवर अन्याय झाला.” वास्तविक ललित मोदी यांच्यावरही घोटाळ्याचा आरोप असून तोही भारत सोडून ब्रिटनमध्ये राहत आहे.
बँकांकडून वसुली
बँकांची फसवणूक करून देश सोडून पळून गेलेल्या विजय मल्ल्याकडून कर्ज वसूल करण्यासाठी त्याच्या मालमत्तेचा भारतात सातत्याने लिलाव होत आहे. त्यामुळे बँकांना त्यांचे गेलेले पैसे परत मिळत आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सांगितले की, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आतापर्यंत फरारी उद्योगपतींची २२,२८० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये विजय मल्ल्याची मालमत्ता विकून १४ हजार कोटी रुपये बँकांना परत करण्यात आले आहेत.
विजय मल्ल्याचा खटला भारतातील आर्थिक गुन्ह्याशी संबंधित आहे. विजय मल्ल्या यांच्यावर बँकांकडून ९ हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. हे किंगफिशर एअरलाइन्सने घेतलेल्या कर्जाशी संबंधित आहे. विजय मल्ल्या मार्च २०१६ मध्ये ब्रिटनला पळून गेला आणि तेव्हापासून तो भारतीय न्यायालयांसमोर हजर झाला नाही. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) विजय मल्ल्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात विविध बँकांना १४,००० कोटी रुपयांहून अधिकची मालमत्ता परत केली आहे.