Join us

लोनवर कार खरेदी केली तरी पश्चाताप होणार नाही, फक्त वापरावी लागेल 'ही' ट्रीक; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 1:05 PM

आजच्या काळात कार हे स्टेटस सिम्बॉल नसून लोकांची गरज बनली आहे. ते विकत घेण्यासाठी पगारदार लोक विशेषत: कार लोनचाही मार्ग स्वीकारतात.

आजच्या काळात कार हे स्टेटस सिम्बॉल नसून लोकांची गरज बनली आहे. ते विकत घेण्यासाठी पगारदार लोक विशेषत: कार लोनचाही मार्ग स्वीकारतात, जेणेकरून त्यांना लाखो रुपये एकरकमी भरावे लागणार नाहीत. पण कर्ज फेडण्याबरोबरच व्याजाचीही चांगली रक्कम भरावी लागते आणि अशा परिस्थितीत खरेदी केलेली कार बरीच महाग पडते. कर्जाचा कालावधी जितका जास्त असेल तितकं व्याज जास्त. 

आता होळीचा सण आला आहे. सणासुदीच्या काळात विविध ऑफर्स पाहता लोक अशी खरेदी करतात. जर तुम्हीही यानिमित्तानं कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि त्यासाठी लोन घ्यायचं असेल, तर अशी पद्धत जाणून घेऊ, जिकडे व्याजासह तुम्ही संपूर्ण लोनची किंमत सहज काढू शकता. फक्त यासाठी आता तुम्हाला एक छोटं काम करावं लागेल. 

जाणून घ्या काय करावं लागेल 

जर तुम्ही बँकेकडून कर्ज घेऊन कार घेण्याचा विचार करत असाल तर सर्वप्रथम तुम्ही विविध बँकांना भेट देऊन स्वस्त कर्जाची माहिती घ्या. जिथे तुम्हाला चांगल्या व्याजदरानं कर्ज मिळेल, तिथूनच कर्ज घ्या. याशिवाय, तुम्ही जे काही कर्ज घेत आहात त्याच्या ईएमआयच्या रकमेच्या किमान ७५ टक्के एसआयपी करा. तुम्ही ज्या कालावधीसाठी कार लोन घेत आहात त्याच कालावधीसाठी ही एसआयपी करा. या फॉर्म्युलासह, तुम्ही बँकेला कार लोन म्हणून भरलेली संपूर्ण रक्कम व्याजासह सहज वसूल करू शकता. 

हे समजून घ्या 

समजा तुम्ही १२ लाख रुपयांची कार घेण्यासाठी बँकेकडून ८ लाख रुपयांचे कर्ज घेतलं आहे. तुम्ही हे कर्ज बँकेकडून ५ वर्षांसाठी घेतलं आहे आणि तुम्हाला हे कर्ज ७.९ टक्के व्याजानं परत करावं लागेल. अशा परिस्थितीत, ८ लाख रुपयांच्या मूळ रकमेसह, तुम्हाला १,७०,९७१ रुपये व्याज द्यावं लागेल. यात, तुम्हाला एकूण ९,७०,९७१ रुपये फेडावे लागतील. यासाठी तुम्हाला मासिक ईएमआय म्हणून दरमहा १६,१८३ रुपये द्यावे लागतील. 

अशा परिस्थितीत, जर तुम्ही १६,१८३ रुपयांच्या ७५ टक्के म्हणजेच १२,१३७ रुपयांची एसआयपी सुरू केली, एसआयपीमध्ये अंदाजे सरासरी परतावा सुमारे १२ टक्के मानला जातो. अशा परिस्थितीत, जर तुम्ही एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात दरमहा १२,१३७ रुपये गुंतवले तर १२ टक्के रिटर्ननुसार एकूण १०,०१,१३७ रुपये जमा होतील. अशा प्रकारे, तुम्ही तुमचं कर्ज ५ वर्षात व्याजासह सहज वसूल करू शकता. 

याकडे जरुर लक्ष द्या 

आर्थिक नियम सांगतो की तुम्ही कार खरेदी करणार असाल तर कारची किंमत तुमच्या वार्षिक पॅकेजच्या निम्म्यापेक्षा जास्त नसावी. जर तुम्ही १२ लाख रुपयांची कार खरेदी करत असाल तर तुमचं पॅकेज किमान २४ लाख रुपये असलं पाहिजे. हे लक्षात घेऊन तुम्ही कार खरेदी केल्यास तुमच्या घराचं बजेट विस्कळीत होणार नाही.  

(टीप - यामध्ये केवळ सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :कारबँक