Join us

कोणत्या कामी येतं टॉपअप लोन, काय आहेत फायदे, कसा करू शकता अर्ज? जाणून घ्या संपूर्ण माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 1:10 PM

पण घर बांधल्यानंतरही अनेक खर्च करावे लागतात ज्यासाठीही पैशांची आवश्यकता असते. जसे की फर्निचर, इंटीरियर इ.

What is Top-Up Loan: आपलं स्वत:चं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. अशा स्थितीत घर बांधण्यासाठी लागणारा मोठा खर्च पाहता लोक होमलोनकडे वळतात. त्यामुळे होमलोन घेऊन स्वत:चं घर घेण्याचं स्वप्न लोक पूर्ण करतात. पण घर बांधल्यानंतरही अनेक खर्च करावे लागतात ज्यासाठीही पैशांची आवश्यकता असते. जसे की फर्निचर, इंटीरियर इ. अशा परिस्थितीत टॉप-अप कर्ज आर्थिक गरज भागवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं. पाहूया टॉप अप लोन म्हणजे नक्की काय असतं.

काय आहे टॉप अप लोन?

टॉप अप कर्ज ही अतिरिक्त कर्जाची रक्कम आहे जी आधीपासून सुरू असलेल्या गृहकर्जाच्या वर घेतली जाऊ शकते. सर्व बँका आणि वित्तीय संस्था त्यांच्या ग्राहकांना टॉप-अप कर्जाची सुविधा देतात. टॉप अप होम लोन हे एक प्रकारचं वैयक्तिक कर्ज आहे जे तुम्हाला कमी व्याजदरात मिळतं. तुमच्या टॉप-अप कर्जाचा कालावधी गृहकर्जावरही अवलंबून असतो.

टॉपअप लोनचे फायदे (Top-Up Loan Benefits)

टॉप-अप लोनचा पहिला फायदा हा आहे की तुम्हाला यामध्ये कोणत्याही सिक्युरिटी आणि गॅरंटीची गरज नाही, याचं कारण म्हणजे तुमच्याकडे आधीच बँकेत सुरू असलेलं होमलोन. टॉप-अप कर्ज हे एक प्रकारचे वैयक्तिक कर्ज आहे, अशा परिस्थितीत तुम्ही हे कर्ज घराचे फर्निचर, रिनोव्हेशन, रिरेअर, बांधकाम किंवा इतर कोणत्याही वैयक्तिक किंवा व्यावसायिक कारणांसाठी वापरू शकता. जर तुम्ही याचा वापर फक्त घर बांधण्यासाठी आणि रिनोव्हेशनसाठी करत असाल तर त्यावरही कर सूट मिळू शकते.

काय आहेत नियम आणि अटी?

टॉप अप लोन देण्यापूर्वी, बँका तुमच्या कर्जाचे हप्ते भरल्याचा रेकॉर्ड तपासतात. ईएमआय पेमेंटशी संबंधित रेकॉर्ड बरोबर असल्यास, तुम्ही सहजपणे टॉप अप कर्ज मिळवू शकता. पण तुमचा रेकॉर्ड खराब असेल तर तुम्हाला ही सुविधा मिळू शकणार नाही. तुम्हाला टॉप-अप होमलोन म्हणून मिळणाऱ्या रकमेबाबत बँकांचे वेगवेगळे नियम असू शकतात. सामान्यतः असं मानलं जातं की टॉप-अप लोनची रक्कम एकूण होमलोनच्या रकमेच्या आणि प्रॉपर्टीच्या मार्केट व्हॅल्यूच्या ७० टक्क्यांपर्यंत असू शकते.

कसा करता येईल अर्ज?

तुम्ही ज्या बँकेतून होमलोन घेतलं आहे त्या बँकेला भेट देऊन किंवा बँकेच्या वेबसाइटद्वारे तुम्ही टॉपअप कर्जासाठी अर्ज करू शकता. तुमच्या होम लोनवर टॉपअप उपलब्ध असल्यानं, लोन घेतल्यानंतर तुम्हाला टॉपअप लोनचे मासिक हप्ते होमलोन पेमेंटसह भरावे लागतील.

टॅग्स :बँक