Debit Card And Credit Card : आर्थिक व्यवहारांसाठी डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड आता सामान्य झाले आहेत. ऑनलाइन बँकिंग किंवा डिजिटल व्यवहारांमध्ये तर डेबिट आणि क्रेडिट कार्ड खूप महत्त्वाचे आहेत. दोघांचाही वापर आर्थिक व्यवहार करण्यासाठी होत असला तरी ही दोन्ही साधने एकमेकांपासून भिन्न आहेत. डेबिट कार्डद्वारे व्यवहार करण्याचे स्वरूप वेगळे आहे, तर क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार करण्याची पद्धत वेगळी आहे. तुम्ही यापैकी कोणतही कार्ड किंवा दोन्ही वापरत असाल तर यांच्यातील फरक समजून घेणे आवश्यक आहे. नाहीतर तुम्हाला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागू शकतो.
डेबिट कार्ड काय आहे?
बँकेद्वारे दिलेल्या डेबिट कार्डला प्लास्टिक कॅश देखील म्हणतात. याचा वापर रोजच्या खरेदीसाठी केला जाऊ शकतो. याद्वारे तुम्हाला एटीएममधून रोख रक्कम काढता येते. इतर ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअरमध्येही खरेदीसाठी याचा वापर होतो. डेबिट कार्डचा वापर कुठल्याही चालू किंवा बचत खात्यातील पैसे एटीएममशीन काढण्यासाठी केला जाऊ शकतो. या कार्डचा वापर करुन आपल्या खात्यातून पैसे काढणे किंवा भरणे दोन्ही गोष्टी होतात.
क्रेडिट कार्ड म्हणजे काय?
'आधी वापरा नंतर पैसे भरा' या धर्तीवर क्रेडिट कार्ड काम करते. खरेदी किंवा कुठल्याही प्रकारचे देयक तुम्ही याद्वारे देऊ शकता. प्रत्येक क्रेडिट कार्डची पूर्वनिर्धारित सीमा असते. उदा. बँकेने तुम्हाला १ लाख रुपयांचे क्रेडिट असलेले कार्ड दिले असेल. तर तुम्ही निर्धआरित वेळेत १ लाख रुपयांपर्यंत खर्च करू शकता. प्रत्येक वेळी तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड वापरता तेव्हा तुम्ही बँक किंवा वित्तीय संस्थेकडून पैसे उधार घेत असता हे लक्षात ठेवा.
Debit Card आणि Credit Card मध्ये काय फरक आहे?
- डेबिट कार्डमध्ये, तुमच्या बचत खात्यातून किंवा चालू खात्यातून निधी खर्च केला जातो, तर क्रेडिट कार्डमध्ये, तुमच्या कार्ड जारीकर्त्याकडून कर्ज घेऊन निधी खर्च केला जातो.
- तुमच्या बँक खात्यात असलेला निधी संपेपर्यंत तुम्ही डेबिट कार्डद्वारे खर्च करू शकता. तर क्रेडिट कार्ड वापरताना बँकेने दिलेल्या मर्यादेच्या बाहेर तुम्हाला जाता येत नाही.
- डेबिट कार्ड सहसा तुमच्या पगार, चालू किंवा बचत खात्यासोबत प्रत्येक बँक देते. याउलट क्रेडिट कार्डसाठी कोणत्याही बँक खात्याची गरज तुम्हाला पडत नाही. तुमचे बँक खाते नसले तरीही तुम्ही क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू शकता.
- डेबिट कार्ड लिमिटेड रिवॉर्ड आणि कॅशबॅक फायदे देतात. तर क्रेडिट कार्ड अधिक विस्तृत रिवॉर्ड आणि कॅशबॅक ऑफर करतात.
- डेबिट कार्डमध्ये ईएमआय सुविधेची उपलब्धता विक्रेता आणि बँक यांच्यातील करारावर अवलंबून असते, तर क्रेडिट कार्डमध्ये, ईएमआय सुविधा सामान्यतः 2,500 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर उपलब्ध असते.
- डेबिट कार्डचा वापर तुमच्या क्रेडिट स्कोअर किंवा CIBIL स्कोअर वर परिणाम करत नाही. याउलट क्रेडिट कार्डचा वापर तुमच्या क्रेडिट स्कोअर वर थेट परिणाम करतो.
- एटीएम/डेबिट कार्ड जास्त रोख पैसे काढण्यावर मर्यादा घालतात. याबाबतीत क्रेडिट कार्ड तुम्हाला अतिरिक्त फायदे देतात. लाउंज एंट्री आणि कार्ड हरवल्यानंतर सुरक्षेचे फायदे देते.
- डेबिट कार्डवर सुमारे 100 ते 500 रुपये वार्षिक देखभाल शुल्क भरावे लागेल. क्रेडिट कार्ड तुलनेत महाग पडतं. यासाठी तुम्हाला 500 रुपयांपेक्षा जास्त वार्षिक सदस्यत्व शुल्क द्यावे लागते. वास्तविक, काही बँका तुम्हाला लाईफ टाईम फ्री क्रेडिट कार्डही ऑफर करत असतात.