Rupay Vs. Visa Card : भारत जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. भारतात ऑनलाईन व्यवहार किंवा डिजिटल व्यवहार खूप महत्वाचे आहेत. कॅशलेस व्यवहारात कार्ड पेमेंटचा ट्रेंडही वाढलाय. आज कार्डच्या माध्यमातून कॅशलेस पद्धतीनं अनेक प्रकारचे व्यवहार करता येतात. जेव्हा नवीन कार्ड निवडण्याची वेळ येते तेव्हा बरेच लोक रुपे आणि व्हिसा यामध्ये गोंधळलेले दिसतात. पण तुम्ही कधी या दोन कार्डमधला फरक समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? जर नसेल, आपण दोन कार्डमधील फरक समजून घेऊ आणि कोणतं चांगलं आहे हे देखील पाहू.
काय आहे फरक?
रुपे कार्ड भारतात मोठ्या प्रमाणात स्वीकारलं जातं, परंतु आपण त्याचा वापर करून आंतरराष्ट्रीय वेबसाइटवर पैसे देऊ शकत नाही. तर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हिसा कार्ड मोठ्या प्रमाणात स्वीकारला जातो. आपण जगातील जवळजवळ प्रत्येक देशात पैसे भरण्यासाठी व्हिसा कार्ड वापरू शकता.
रुपे कार्डमधील व्यवहार शुल्क इतर कार्ड नेटवर्कच्या तुलनेने कमी आहे, कारण या कार्डद्वारे केले जाणारे प्रत्येक व्यवहार भारतातच केले जातात. तर व्हिसा हे आंतरराष्ट्रीय पेमेंट नेटवर्क असल्यानं व्यवहाराची प्रोसेस देशाबाहेर होते. त्यामुळे यावर रुपेपेक्षा अधिक प्रोसेसिंग फी लागते.
ट्रान्झॅक्शन स्पीड
रुपे कार्डचा ट्रान्झॅक्शन स्पीड व्हिसा आणि इतर पेमेंट नेटवर्कपेक्षा अधिक आहे. व्हिसा कार्डमधील व्यवहारांचा वेग रुपेपेक्षा तुलनेनं कमी आहे. रुपे कार्डचे प्रायमरी टार्गेट विशेषत: ग्रामीण भारत आहे. तर भारतात व्हिसा कार्ड टियर १ आणि टियर २ शहरांमध्ये अधिक प्रचलित आहेत.
कोणतं आहे उत्तम?
रुपे कार्ड आणि व्हिसा कार्ड मध्ये कोणतं कार्ड चांगले आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्या वापर आणि गरजा म्हणजेच आपण कोणत्या प्रकारचे व्यवहार करता यावर अवलंबून असतं. जर तुम्ही देशांतर्गत व्यवहार करत असाल तर रुपे कार्ड हा उत्तम पर्याय आहे. त्याचं कमी ट्रान्झॅक्शन शुल्क आणि जलद प्रक्रिया यामुळे ते दैनंदिन वापरासाठी योग्य ठरतं. परंतु जर आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करत असाल किंवा वारंवार परदेशात प्रवास करत असाल तर व्हिसा कार्ड आपल्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतं.