UPI Credit Line : दिवसेंदिवस ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पूर्वीसारखं सोबत कॅश बाळगण्याचं कटकट गेली आहे. भाजीबाजार असो की मॉल, लोकं आता फक्त मोबाईल घेऊन बाहेर पडतात. मात्र, कधीकधी बँक खात्यातील रक्कम संपलेली आपल्याला माहित होत नाही. अशा परिस्थितीत ऐनवेळी फजिती होण्याची शक्यता असते. तुमच्यावरही कधी अशी परिस्थिती आली तर गडबडून जाऊ नका. कारण, तुमच्या बँक खात्यात पैसे नसतानाही तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकणार आहे. तुम्ही युनिफाइड पेमेंट इंटरफेस अर्थात UPI द्वारे पेमेंट करू शकता. वास्तविक, भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी UPI क्रेडिट लाइन प्लॅटफॉर्म योजना आणली होती. या अंतर्गत कोणताही युपीआय वापरकर्ता बँख खात्यात पैसे नसतानाही पेमेंट करू शकतो.
या बँकाही सुरू करणार काम
केंद्रीय बँकेने UPI द्वारे ग्राहकांना क्रेडिट लाइन देण्याची परवानगी दिली आहे. यावर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे देखरेख ठेवली जाईल. ॲक्सिस बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय, इंडियन बँक आणि पीएनबीसह अनेक बँका या नवीन सुविधेवर काम करत आहेत. यामध्ये एक क्रेडिटवर तुम्हाला एक निश्चित रक्कम दिली जाणार आहे. जी तुम्हाला गरज असेल तेव्हा वापरता येईल. कोणीही ही सुविधा वापरू शकते. अशा परिस्थितीत लोकांचे क्रेडिट कार्डवरील अवलंबित्व कमी होईल.
UPI क्रेडिट लाइन कशी सक्रिय करावी?
- स्टेप : UPI क्रेडिट लाइन सुविधा सक्रिय करण्यासाठी, तुम्ही संबंधित बँकेच्या शाखेत किंवा UPI ॲपद्वारे अर्ज करू शकता. यात तुम्हाला अर्जामध्ये तुमच्या वार्षिक कमाईचा तपशील द्यावा लागेल आणि आवश्यक कागदपत्रे देखील सबमिट करावी लागतील.
- स्टेप : UPI Credit Line साठी अर्ज करण्यासाठी तुम्ही वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली असावी. याशिवाय अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे आधार आणि पॅनकार्ड असणे आवश्यक आहे.
- स्टेप : तुम्ही ज्या बँकेत क्रेडिट लाइनसाठी अर्ज केला आहे. ती बँक तुमची क्रेडिट मर्यादा सेट करेल. बँकेकडून मंजुरी मिळाल्यानंतर, तुम्ही ते UPI ॲप्लिकेशनमध्ये लिंक करू शकता.