RBI Action on Paytm Payments Bank: तुम्ही One97 कम्युनिकेशन्सची उपकंपनी पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडच्या सेवांचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. आरबीआयनं (RBI) पेटीएम पेमेंट्स बँकेच्या काही सेवांवर बंदी घातली आहे. दरम्यान, ग्राहकांना ट्रान्सफर आणि पैसे काढण्याची परवानगी असेल. पेटीएम विरोधात आरबीआयच्या या कारवाईचा ग्राहकांवर काय परिणाम होणार आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
येथे आम्ही तुम्हाला पेटीएममध्ये काय काम करेल आणि काय काम करणार नाही याची संपूर्ण माहिती देणार आहोत, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही. पेटीएमच्या म्हणण्यानुसार, कंपनीला रिझर्व्ह बँकेकडून वित्तीय सेवांबाबत सूचना मिळाल्या आहेत. पेटीएम वापरणाऱ्या ग्राहकांना कोणत्याही अडचणींना सामोरं जावं लागू नये यासाठी कंपनी आरबीआयकडून मिळालेल्या सूचनांचे पालन करण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलत आहे.
काय चालणार नाही?
आरबीआयच्या या निर्णयामुळे अशा युझर्सना समस्या निर्माण होऊ शकतात ज्यांनी त्यांचे Paytm Payments Bank खातं युपीआयशी (UPI) लिंक केलं आहे. तुमचा युपीआय आयडी एसबीआय किंवा आयसीआयसीआय सारख्या इतर बँक खात्याशी जोडलेला असेल, तर आरबीआयच्या कारवाईचा तुमच्यावर परिणाम होणार नाही. जे दुकानदार त्यांच्या पेटीएम पेमेंट्स बँक खात्यात पैसे घेतात त्यांना पेमेंट मिळू शकणार नाही. पेटीएम फास्टॅग युझर्सना दुसऱ्या जारीकर्त्याकडून नवीन टॅग खरेदी करावा लागेल आणि सध्या वापरत असलेला फास्टॅग निष्क्रिय करावा लागेल. पेटीएम द्वारे कर्ज घेणाऱ्यांना नियमित परतफेड करत राहावं लागेल.
या सेवांवर परिणाम नाही
पेटीएमवर ही बंदी पेटीएम पेमेंट्स बँकेच्या सेवांवर आहे, पेटीएम ॲपवर नाही. याचा अर्थ पेटीएम ॲपचे युझर्स पूर्वीप्रमाणे ॲपच्या सेवा वापरण्यास सक्षम असतील. पेटीएमच्या म्हणण्यानुसार, कंपनी आरबीआयच्या सूचनांचे पालन करण्यासाठी त्वरित पावलं उचलत आहे. याचा वापरकर्त्यांच्या बचत खाती, वॉलेट, फास्टॅग आणि एनसीएमसी खात्यांमध्ये जमा केलेल्या रकमेवर परिणाम होणार नाही, असं कंपनीनं म्हटलंय. येथे उपलब्ध असलेली त्यांची शिल्लक ग्राहक वापरू शकतात. तर दुसरीकडे ग्राहकांना उपलब्ध बॅलन्सचा वापर करता येणार आहे. पेटीएम पेमेंट कंपनी म्हणून अनेक बँकांसोबत काम करत आहे.
आता कंपनी आपल्या अन्य योजनांना गती देईल आणि इतर बँकांसोबत भागीदारीचा पाठपुरावा करेल. यापुढे कंपनी पीपीबीएल सोबत नाही तर इतर बँकांसोबत काम करेल. कंपनीच्या उर्वरित वित्तीय सेवा, जसं की कर्ज वितरण, विमा वितरण आणि इक्विटी ब्रोकिंग, कोणत्याही प्रकारे सहयोगी बँकेशी संबंधित नाहीत आणि याचा परिणाम होणार नाही अशी अपेक्षा आहे. पेटीएम क्यूआर, पेटीएम साउंडबॉक्स, पेटीएम कार्ड मशीन यासारख्या ऑफलाइन व्यापारी पेमेंट नेटवर्क ऑफरिंग नेहमीप्रमाणे सुरू राहणार असल्याचं कंपनीनं म्हटलं.
भागीदारीचा विस्तार
कंपनीच्या म्हणण्यानुसार, २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत ओसीएल आणि Paytm Payments Services Limited (PPSL) चं नोडल खातं बंद करण्याच्या सूचनांच्या संदर्भात, पीपीएसएल सोबत, या कालावधीत नोडल इतर बँकांमध्ये ट्रान्सफर करेल. यासाठी इतर बँकांशी भागीदारी केली जाईल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, आरबीआयच्या या पावलामुळे, त्यांचा वार्षिक EBITDA मध्ये सुमारे ३००-५०० कोटी रुपयांची घट होण्याची शक्यता आहे.