Join us  

Top up Home Loan : टॉप अप होम लोन म्हणजे काय काय रं भाऊ? ते कधी आणि का घ्यावे?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2024 11:15 AM

Top up Home Loan : तुमच्यावर गृहकर्ज असताना वैयक्तिक कर्ज काढण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुम्हाला मार्गदर्शक ठरू शकते. यामध्ये तुमचे पैसे वाचणार आहे.

Top up Home Loan : जगात कर्ज घेण्याची व्यवस्था नसती तर कित्येक लोकांची स्वप्न अपूर्णच राहिली असती. मात्र, कर्ज घेताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा. अन्यथा कर्जात बुडालेली कित्येक लोकांची उदाहरणे तुमच्या आसपास पाहायला मिळतील. बहुतेक लोक घर घेण्यासाठी गृहकर्ज घेतात. गृहकर्ज हे सर्वात दीर्घ मुदतीचे कर्ज आहे. यामध्ये तुम्हाला दीर्घ मुदतीसाठी भरपूर व्याज द्यावे लागते. अशा परिस्थितीत गृहकर्ज घेण्यापूर्वी, विविध बँकांच्या ऑफर तपासल्या पाहिजेत. तिथे तुम्हाला किफायतशीर वाटेल तिथूनच गृहकर्ज घ्या. 

गृहकर्ज ग्राहकांना अनेक वेळा घर खरेदी करण्यासाठी किंवा बांधण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी पैशांची गरज भासते. अशा परिस्थितीत महागडे वैयक्तिक कर्ज घेण्याऐवजी हे ग्राहक टॉप अप होम लोन घेऊ शकतात. जिथे तुम्हाला कमी व्याजदराचा लाभ मिळतो. गृहकर्ज असणाऱ्या ग्राहकांसाठीच हे कर्ज आहे.

टॉप-अप होम लोनचे विशेष फायदे

  • अनेक वेळा गृहकर्जाव्यतिरिक्त काही अतिरिक्त खर्च करावे लागतात. होम लोन टॉप अप हे खर्च भागवू शकते.
  • तुमचे कर्ज मॅनेज करण्यासाठी टॉप अप होम लोन हा एक परवडणारा उपाय आहे.
  • टॉप-अप होम लोन ग्राहकांना त्यांच्या सध्याच्या कर्जाच्या रकमेवर आणि त्याहून अधिक अतिरिक्त कर्ज घेण्यास अनुमती देते.
  • परतफेडीसाठी कमी कालावधी निवडल्यास टॉप-अप गृहकर्ज ग्राहकांसाठी फायदेशीर ठरतात.
  • टॉप अप कर्जावर, ग्राहकाला त्याच्या विद्यमान बँक किंवा फायनान्य कंपनीकडून अधिक चांगली डील मिळते. यामुळे तुमचा कर्ज घेण्याचा एकूण खर्च कमी होतो.
  • टॉप-अप होम लोनचा कालावधी बँकेनुसार बदलतो. उदाहरणार्थ, स्टेट बँक ऑफ इंडिया ३० वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी टॉप-अप गृहकर्ज देते.
  • टॉप अप होम लोनवरील व्याजदर सामान्यतः नियमित गृहकर्ज दरांपेक्षा किंचित जास्त असतात. हे दर ग्राहकाच्या प्रोफाइलवरही अवलंबून असतात.
  • गृहकर्ज आणि टॉप-अप गृहकर्ज दरांमधील फरक सामान्यतः १ ते २ टक्क्यांच्या दरम्यान असतो.
  • ग्राहकाने कोणताही ईएमआय न चुकवता १२ महिन्यांसाठी गृहकर्जाची परतफेड केल्यास, तो गृहकर्ज टॉप-अपचा लाभ घेण्यास पात्र ठरतो.
  • बँकेने मंजूर केलेली रक्कम देखील नियमित गृहकर्जामध्ये भरलेल्या मासिक हप्त्यांवर अवलंबून असते. या कर्जामुळे तुम्हाला वैयक्तिक कर्जासाठी स्वतंत्रपणे अर्ज करावा लागणार नाही. 
टॅग्स :सुंदर गृहनियोजनबँकिंग क्षेत्रपैसा