Raghuram Rajan : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि आता शिकागो विद्यापीठात प्राध्यापक असलेले डॉ. रघुराम राजन यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रिझर्व्ह बँकेतील आपल्या कार्यकाळाबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं. त्यांच्यासमोरील आव्हानं, त्यांनी राबवलेली धोरणं आणि त्यांच्या कार्यकाळ पूर्ण होण्याबाबतचा वाद यावर चर्चा करण्यात आली. राजन यांच्या उत्तरांतून त्यांच्या भूमिकेतील गुंतागुंत आणि पदावर असताना त्यांना आलेल्या बाहेरील दबावांची कल्पना आली. आपली बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याची कबुली राजन यांनी दिली.
"मला बदनाम करण्यासाठी एक प्रकारची मोहीम सुरू होती. ते वाक्य संदर्भाबाहेर घेऊन जात होते. नंतर ते पुढे रेटण्याचा प्रयत्न करत होते. हा नवा ट्रेंड नाही. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असतानादेखील हे प्रचलित होते. मी रिझर्व्ह बॅंकेचा गव्हर्नर असतानाही हे सुरूच होतं, असं राजन यावेळी म्हणाले. द प्रिन्टला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
महागाई नियंत्रणात आणण्यावर भर
राजन यांचे धोरणात्मक निर्णय, विशेषत: महागाई नियंत्रणावर त्यांनी दिलेलं लक्ष कौतुकास्पद होतं. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असताना हे धोरणात्मक निर्णय महत्त्वाचे होते. महागाईला लगाम घालण्यासाठी व्याजदरात वाढ करण्याच्या सुरुवातीच्या पावलांना प्रभावशाली व्यावसायिक व्यक्तींचा विरोध असल्याचं त्यांनी सांगितलं.
"सुरुवातीला महागाई कमी करण्यासाठी व्याजदर वाढवण्यात येत होते आणि ज्यांनी अधिक कर्ज घेतलं होतं, त्यांना अचानक याचा परिणाम दिसू लागला. हा विरोध अतिशय तीव्र होता. काही व्यावसायिकांनी धमक्याही दिल्या होत्या." असं राजन म्हणाले.
व्यावसायिकांकडून धमकी
"मला व्यावसायिकांकडून धमक्या मिळाल्या. तुम्ही 'हे' काम करा अन्यथा आम्ही तुम्हाला नोकरीवरून काढून टाकू," अशी त्यांनी धमकी दिल्याचे ते म्हणाले. हे प्रभावशाली लोक होते का? या प्रश्नावर उत्तर देताना कधीकधी व्यावसायिकांना वास्तवापेक्षा आपला प्रभाव अधिक जाणवतो, असंही त्यांनी नमूद केलं. "जर मी त्यांच्या धमक्यांना बळी पडलो असतो, तर मी तसाही नोकरीवरून बाहेर गेलो असतो. कारण मी तेव्हा माझं काम अतिशय खराब पद्धतीनं केलं असतं." असं राजन यांनी नमूद केलं.