लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : पेटीएम पेमेंट्स बँकेवर कठोर कारवाई करण्याची तयारी भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) चालविली असल्याचे वृत्त आहे. त्यानुसार, पेटीएम बँकेचा व्यवसाय परवानाही रद्द केला जाऊ शकतो, असे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. प्राप्त माहितीनुसार, पेटीएम पेमेंट्स बँकेला व्यवसाय व व्यवहार समायोजनासाठी (सेटलमेंट) १५ मार्चपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. त्यानंतर रिझर्व्ह बँकेकडून या बँकेचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाऊ शकते.
३१ जानेवारी रोजी रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेविरुद्ध कठोर कारवाई करताना बँकेच्या बहुतांश सेवा रोखल्या होत्या. या कारवाईनंतर पेटीएमची पालक कंपनी ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’च्या समभागात मोठी घसरण झाली. ५ फेब्रुवारीपर्यंत कंपनीचा समभाग ४३ टक्के घसरला. आता समभागांत काही प्रमाणात सुधारणा झालेली दिसत आहे.
अनेकदा केले सावधकामकाजातील त्रुटी सुधारण्यासाठी पेटीएमला संधी दिली होती. तथापि, सुधारणा करण्यात कंपनीला अपयश आले. आरबीआयने पेटीएमला अनेक वेळा गंभीर इशाराही दिला होता. तथापि, कंपनीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.
कोणताही व्यवहार करता येणार नाहीआपले व्यवहार आणि नोडल खाती १५ मार्चपर्यंत समायोजित करण्याच्या सक्त सूचना पेटीएम बँकेला दिल्या आहेत. १५ मार्चनंतर कोणत्याही व्यवहाराची परवानगी बँकेला दिली जाणार नाही.