RBI MPC Meeting : रिझर्व्ह बँकेच्या (RBI) पतधोरण समितीची (MPC) तीन दिवसीय बैठक बुधवारपासून सुरू झाली. या बैठकीत काय निर्णय घेतले जातील याची माहिती शुक्रवारी दिली जाईल. बैठकीनंतर समितीचे अध्यक्ष आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास शुक्रवारी, ७ जून रोजी रेपो दराच्या निर्णयाची माहिती देतील. सध्याचा रेपो दर ६.५० टक्के आहे. नव्या आर्थिक वर्षातील (FY25) पतधोरण समितीची ही दुसरी बैठक आहे.
मजबूत आर्थिक वृद्धी आणि अनिश्चित महागाईच्या दृष्टीकोनाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक शुक्रवारच्या रिव्ह्यूमध्ये आपलं कठोर पतधोरण कायम ठेवण्याची अपेक्षा आहे. आता देशात लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत. देशात भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार स्थापन होताना दिसत आहे. अशा तऱ्हेनं एनडीएचं सरकार स्थापन होण्यापूर्वी तुमच्या गृहकर्जाचा ईएमआय कमी होणार की नाही, हा मोठा प्रश्न आहे.
काय म्हणाले तज्ज्ञ?
"निवडणुकीचे निकाल पाहता सरकारमध्ये तेच लोक असले तरी ते त्याच भूमिकेवर ठाम राहतील की नाही, याचा निर्णय येत्या काही दिवसांत होईल. त्यामुळे अनिश्चिततेचं प्रमाण खूप वाढलं आहे. रिझर्व्ह बँकेला हे लक्षात ठेवावं लागेल," असं अर्थतज्ज्ञ प्रणव सेन यांनी सांगितलं. एसबीआयच्या सौम्यकांती घोष यांच्या मते, "सरकार ५ टक्क्यांपेक्षा थोडं कमी आणि ४.९% ते ५% डेफिसिट घेऊन काम करू शकते. महागाई लवकर ४ टक्क्यांपर्यंत जाणार नाही. पण वर्षातील बहुतांश काळ ती ४.५ टक्क्यांच्या आसपास राहील." सध्याची परिस्थिती, सध्याचा महागाईचा वेग आणि सध्याचा विकासाचा मार्ग पाहता रिझर्व्ह बँकेनं सरासरी महागाई ४.५ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
आता किती आहे रेपो दर?
मात्र, मे महिन्यात झालेल्या सर्वेक्षणात ७२ पैकी ७१ अर्थतज्ज्ञांनी एमपीसी ५ ते ७ जून या कालावधीत होणाऱ्या बैठकीत रेपो दर ६.५० टक्क्यांवर कायम ठेवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. याव्यतिरिक्त, यापैकी बहुतेक अर्थतज्ज्ञांचं मत आहे की ६.५०% चा दर हा सध्याच्या काळातील रेपो दराचं शिखर आहे. फेब्रुवारी २०२३ पासून रेपो दर ६.५ टक्क्यांच्या उच्चांकी पातळीवर कायम आहे.
अर्थव्यवस्थेतील तेजीदरम्यान एमपीसी व्याजदरात कपात टाळेल, असं मानलं जात आहे. रिझर्व्ह बँकेनं फेब्रुवारी २०२३ मध्ये रेपो दरात ६.५ टक्क्यांपर्यंत वाढ केली होती आणि त्यानंतर सलग सात वेळा तो कायम ठेवला आहे. एमपीसीमध्ये तीन बाह्य सदस्य आणि आरबीआयचे तीन अधिकारी असतात. दर निश्चिती समितीचे बाह्य सदस्य शशांक भिडे, आशिमा गोयल आणि जयंत आर. वर्मा आहेत.