Join us

महिलांना बँकांमध्ये नोकरीची सर्वाधिक संधी मिळणार; RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2024 8:30 PM

वित्तीय क्षेत्र हे महिलांना अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून तसेच महिला चालवत असलेल्या उद्योगांना प्रोत्साहन देऊन समाजातील लैंगिक असमानता दूर करू शकते, असे दास म्हणाले.

बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या महिलांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बँकांनी महिलांना जास्तीत जास्त नोकरी देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे महत्वाचे आवाहन केले आहे. 

वित्तीय क्षेत्र हे महिलांना अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून तसेच महिला चालवत असलेल्या उद्योगांना प्रोत्साहन देऊन समाजातील लैंगिक असमानता दूर करू शकते, असे दास म्हणाले. इंडियन बँक्स असोसिएशन आणि FICCI यांच्या संयुक्त परिषदेला दास संबोधित करत होते. 

प्रत्येक नागरिकाला सामाजिक-आर्थिक स्थितिद्वारे आर्थिक सेवांपर्यंत पोहोचता यायला हवे. तसेच आवश्यक वित्तीय साक्षरता देखील प्राप्त झाली पाहिजे हे विकसित भारतात पाहिले गेले पाहिजे. आस्थापनांच्या कामामध्ये जगाच्या तुलनेत महिलांचा सहभाग खूपच कमी आहे. ही तफावत कमी करण्यासाठी मुलींचे शिक्षण, कौशल्य विकास, कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि सामाजिक अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांपैकी एक पंचमांश (एमएसएमई) महिलांच्या नियंत्रणाखाली असूनही, महिला उद्योजकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो, लैंगिक असमानता कमी करण्यासाठी आर्थिक क्षेत्राला महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल, असे दास म्हणाले. 

वित्तीय संस्थांमध्ये अधिकाधिक महिलांना रोजगार देऊन आणि विशेषत: महिला चालवत असलेले उद्योगधंद्यांना विविध योजनांचा लाभ देऊन ही विषमता दूर करायला हवी असे ते म्हणाले. बँकांना अधिकाधिक 'बँक सखी'ना सोबत घेण्याचे आवाहन दास यांनी केले. 

टॅग्स :शक्तिकांत दासभारतीय रिझर्व्ह बँकबँकिंग क्षेत्र