सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयच्या अनेक ग्राहकांना त्यांच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर सध्या एक मेसेज येत आहे. यामध्ये काही संशयास्पद व्यवहारांमुळे त्यांचं खातं ब्लॉक करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. जर तुम्हाला असा मेसेज आला असेल तर त्याकडे बिलकुल लक्ष देण्याची गरज नाही. याबाबत सतर्क राहणं आवश्यक आहे. स्कॅमर्सद्वारे पाठवण्यात येणारा हा बनावट मेसेज आ हे. जर तुम्हालाही असा मेसेज आला असेल तर त्याचं उत्तर देऊ नका आणि त्याची सूचना तात्काळ बँकेला द्या.
पीआयबी फॅक्ट चेकनं एसबीआयच्या ग्राहकांना या फेक मेसेज बाबत इशारा दिलाय. संशयास्पद व्यवहारांमुळे तुमचं खातं तात्पुरतं लॉक करण्यात आलं, असा एसीबीआयच्या नावानं केला जाणारा दावा खोटा आहे. तुमचे बँकिंग डिटेल मागणाऱ्या अशा कोणत्याही एसएमएस आणि ईमेलला उत्तर देऊ नका. अशा मेसेजेसबाबत तात्काळ report.phishing@sbi.co.in वर तक्रार करा, अस पीआयबीनं म्हटलंय.
क्लिक केल्यास काय होतं?
जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या लिंकवर क्लिक करता तेव्हा तुमच्या बँक खात्याचे आणि तुमची वैयक्तिक माहिती स्कॅमर्सना मिळण्यास मदत होते. अशा स्थितीत तुमचं अकाऊंट रिकामं होऊ शकतं. स्कॅमर्सद्वारे तुमच्या ईमेल आयडीवर पाठवण्यात आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक केल्यास त्यांना तुमच्या खात्यापर्यंत पोहोचण्यास आवश्यक डेटाचा ॲक्सेस मिळतो.