नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे अनेक कंपन्या आर्थिक संकटात सापडल्या आहेत. त्यामुळे अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून आले. यातच आता एका सरकारी कंपनीने सुद्धा आपल्या २० हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
टेलिकॉम क्षेत्रातील सरकारी कंपनी भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) जवळजवळ २० हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, असा दावा बीएसएनएलच्याकर्मचारी युनियने केला आहे. याआधी बीएसएनएलने ३० हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना कमी केले आहे. विशेष म्हणजे, या कर्मचाऱ्यांना गेल्या एक वर्षाहून अधिक काळ वेतन दिले गेले नाही, असेही युनियने म्हटले आहे.
बीएसएनएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पीके पुरवार यांना लिहिलेल्या पत्रात युनियनने म्हटले आहे की, स्वेच्छा सेवानिवृत्ती योजनेनंतर (व्हीआरएस) कंपनीची आर्थिक परिस्थिती आणखी खालावली आहे. विविध शहरांमध्ये मनुष्यबळ नसल्यामुळे नेटवर्क सदोषपणाची समस्या वाढली आहे.
कर्मचारी युनियनने दिलेल्या माहितीनुसार, व्हीआरएस योजना अंमलात आल्यानंतर देखील कर्मचाऱ्यांना नियमित वेळेत पगार दिला जात नाही. गेल्या १४ महिन्यापासून पगार दिला नाही. यामुळे १३ कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली.
दरम्यान, अलीकडेच बीएसएनएलने सर्व मुख्य महाव्यवस्थापकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांवरील खर्च कमी करण्यासाठी त्वरित पावले उचलण्याचे आदेश जारी केले आहेत. याशिवाय, ठेकेदारांमार्फत कंत्राटी कर्मचारी कमी करण्यास सांगितले होते.
आणखी बातम्या...
- एकतर ती संस्कारानेच कृतघ्न किंवा मानसिक संतुलन ढासळलेले; धनंजय मुंडेंची कंगनाला चपराक
-'...अन्यथा कंगनाच्या सिनेमाचे सेट जाळून टाकू', करणी सेनेचा इशारा
- कंगनाने मुंबईला शहाणपण शिकवण्याची गरज नाही; भाजपाचा 'यू-टर्न'
- मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा; कंगनाचे खुले आव्हान
- पोकळ धमक्या देत नाही, अॅक्शन घेतो; संजय राऊतांचा कंगना राणौतवर हल्लाबोल