Citi, Morgan Stanley on Bajaj Finance Limited: दिग्गज ब्रोकरेज फर्म सिटी आणि मॉर्गन स्टॅनली यांनी बजाज फायनान्सच्या (Bajaj Finance Share Price) शेअर्सबाबत गुंतवणूकदारांना खुशखबर दिली आहे. दोघांनीही शेअरला 'बाय' रेटिंग दिलं आहे. एवढेच नव्हे तर या शेअरमध्ये मोठी वाढ होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आलीये. कंपनीची मजबूत रणनीती, तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणं आणि वाढीच्या शक्यता लक्षात घेता सिटी आणि मॉर्गन स्टॅनली उत्साही आहेत. बजाज फायनान्स लिमिटेडचा शेअर बुधवारी २.६१ टक्क्यांनी वधारून बंद झाला. बजाज फायनान्स लिमिटेडचा शेअर गेल्या वर्षभरात २.६६ टक्क्यांनी घसरला आहे.
९ हजारांपर्यंत जाऊ शकतो शेअर
ब्रोकरेज हाऊस सिटीनं बजाज फायनान्स लिमिटेडच्या शेअरवर ८१५० रुपयांचं टार्गेट ठेवलं आहे. तर मॉर्गन स्टॅनलीने ते आणखी जास्त (ओव्हरवेट) ९००० रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केलाय. बजाज फायनान्स लिमिटेडच्या शेअरचा सध्याचा बाजारभाव (सीएमपी) ७११५.७५ रुपये आहे. बजाज फायनान्सनं 'BFL 3.0- A Final Company' या नावानं आपली नवीन दीर्घकालीन (२०२५-२९) रणनीती जाहीर केली आहे. याअंतर्गत कंपनीनं स्वत:साठी एकूण पाच उद्दिष्टे निश्चित केली आहेत.
यावर असेल फोकस
कंपनीला पेमेंट क्षेत्रात १% मार्केट शेअर मिळवायचा असल्याचं बजाज फायनान्स लिमिटेडने २०२५-२९ या वर्षाच्या आपल्या धोरणात म्हटलंय. तसंच, कंपनीचे लक्ष एमएसएमई क्षेत्रावर केंद्रित झाले असून एमएसएमई क्षेत्र हे पुढील ग्रोथ इंजिन असणं आवश्यक आहे. पर्सनल लोन, गोल्ड लोन, मायक्रोफायनान्स आणि टू-व्हीलर फायनान्समध्ये मार्केट लीडर बनणं हे कंपनीचे तिसरं ध्येय आहे. याशिवाय ऑटो लोन व्यवसायात आणखी सुधारणा करावी लागेल आणि ग्रीन फायनान्सिंग आणि कॉर्पोरेट लीजिंगसारखी नव्या क्षेत्रातही उतरण्याचा कंपनीचा विचार आहे.
AI चा वापर करणार
बजाज फायनान्स लिमिटेड आपल्या २२ कोटी ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. यामुळे कंपनीची कार्यक्षमता वाढण्यास आणि वाढीला गती मिळण्यास मदत होईल. खर्च कमी करण्यासाठी कंपनीनं अनेक पावलं उचलली आहेत. 'Genal' नावाच्या प्रकल्पांतर्गत २५ वर्क प्लेसमध्ये २९ युज केसेस राबविण्यात येणार असून, यामुळे आर्थिक वर्ष २०२६ मध्येच १५० कोटी रुपयांची बचत होणार आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)