गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढउतार पाहायला मिळत आहेत. सोनं हे भारतीय लोकांसाठी गर्वाचं आभूषण आहे. कठीण काळात घराला आणि पर्यायानं संसाराला हातभार लावणारं साधन म्हणूनही सोन्याकडे पाहिलं जातं. पारंपरिक गुंतवणुकीच्या साधनांमध्ये सोन्याचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. भारतात आणि जगातही मागच्या आठवड्यात सोन्याने नवा उच्चांक गाठला. त्याच पार्श्वभूमीवर आम्ही सोन्यातील गुंतवणूक किती फायदेशीर आहे, यासंदर्भात ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांचं मत जाणून घेतलं.
सोन्यातली गुंतवणूक फायदेशीर आहे का?
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक म्हणतात, सोन्यातील गुंतवणूक ही अजिबात फायदेशीर नाही, कारण सोन्याचे भाव वाढले तरी आपण सोनं काही विकायला जात नाही. नुसते कागदोपत्री भाव वाढून त्याचा काहीही उपयोग नाही, त्यामुळे देशाचंही नुकसान होतं आणि आपलंही नुकसान होतं. तसेच घेतलेलं सोनं विकायला गेल्यानंतर सोनार त्यात काही ना काही घट काढतो, त्यामुळे आपलं नुकसान होतंच. सोन्याचे कागदोपत्री भाव जरूर वाढतात, ते नाकारता येत नाही. पण त्यातून आपल्या हाती किती फायदा येतो, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. गुंतवणूकदारही सोनं विकत घेतात, पण ते विकत नाही, त्यामुळे त्यातून काहीच फायदा होत नाही. सोन्याचे दर जरी वाढत असले तरी सोनं कोणीही विकत नाही. त्यामुळे काहीही फायदा होत नाही. मात्र, आपण जर बाजारभावाचा उपयोग करून सोनं घेणार असू तर सोन्यासारखी फायदेशीर गुंतवणूक नाही हे मान्य!
एमसीएक्स आणि लोकल दर वेगवेगळे का?
चंद्रशेखर टिळक म्हणतात, होलसेल प्राइज इंडेक्स आणि रिटेल प्राइज इंडेक्स असतो, त्यामुळेच हे दर वेगवेगळे असतात. एमसीक्सवर जे दर असतात, तिथे आपल्याला सोन्याची डिलेव्हरी मिळत नाही. कॅमॉडिटी मार्केटचा जो रेट आहे, त्यानुसार तिथून आपण डिलिव्हरी घेतो. त्यामुळे हे दर वेगवेगळे असतात
सोनं १० ग्रॅम म्हणजे १ तोळा हे कसं ठरलं?
टिळक म्हणतात, १ तोळा सोनं हे १० ग्रॅम दशमान पद्धतीत बसवणं सोपं जातं. अख्ख्या जगात तशीच पद्धत आहे. १ किलो म्हणजे १००० ग्रॅम असते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर दर निश्चित करणं सोयीस्कर ठरतं, असंही चंद्रशेखर टिळक म्हणाले आहेत.
यासंदर्भात सुवर्ण व्यावसायिक पराग पेठे यांना विचारलं असता, ते म्हणाले, दोन वर्षांसाठी जर सोन्यात गुंतवणूक केली, तर ती फायदेशीर ठरू शकते. खरेदी आणि विक्रीत प्रत्येक दुकानदाराला मार्जिन ठेवावं लागतं. आज भाव ५१,५०० आहे, जर तुम्ही १०० ग्रॅम सोनं घेतलंत तर त्याचे होतात ५ लाख १५ हजार. हेच जर दोन महिन्यांनी सोनं विकायला आणल्यास ज्वेलर्स हा प्रॉफिट मार्जिन आणि खरेदी-विक्री मार्जिन ठेवूनच विकत घेतो. खऱ्या सोन्यात घट नसते, त्यात बाइंग-सेलिंग मार्जिन असते. डॉलर आणि रुपये असा त्यात फरक असतो, ज्वेलर्स आणि डिलर्स हे दोन प्रकार असतात. डिलर्सकडून सोनं घेतल्यानंतर त्याचे भाव वाढतात, म्हणून एमसीएक्स आणि स्थानिक दरांमध्ये तफावत आढळून येत असते. तसेच जीएसटी लागल्यानं दरांमध्ये फरक पडत असल्याचं सुवर्ण व्यावसायिक पराग पेठे यांनी सांगितलं आहे. मोदी सरकारच्या सॉवरेन गोल्ड बाँड(Sovereign Gold Bond) योजनेंबद्दल विचारले असता ते म्हणाले, आपण उद्याचं नाही सांगू शकत तर सात वर्षं कोण थांबणार, दीर्घकाळासाठी ही योजना फायदेशीर असली तरी कोणीही एवढ्या काळासाठी गुंतवणूक करत नाही.
कसा ठरतो सोन्याचा भाव?
डॉलरची किंमत दिवसेंदिवस वाढत जात आहे, त्यामुळे सोन्याच्या भावाने ४५ हजारांचा टप्पा कधीच पार केला आहे, तर दुसरीकडे कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. अशा परिस्थितीत लोकांचा सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे कल वाढला आहे. विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर मार्ग नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला.
आता सोन्याचा भाव लंडनमध्ये ठरवला जातो. जगातले १५ बँकर्स(बँका) एकत्र येऊन सोन्याचा भाव ठरवतात. या १५ बँकांमध्ये मॉर्गन स्टॅनली, एचएसबीसी, नोव्हा स्कॉटिया, स्टँडर्ड चार्टर्ड अशी काही प्रसिद्ध नावे आहेत. इतर दोन बँका चिनी आहेत. बँक ऑफ चायना आणि इंडस्ट्रियल अँड कमर्शिअल बँक ऑफ चायना अशी नावे आहेत. सोन्याचा भाव ठरवण्यात आयजीबेए म्हणजेच इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचा महत्त्वाचा हिस्सा असतो. या संघटनेचे सभासद भारतातील मोठे व्यापारी असतात. खरेदी आणि विक्री असे दोन दर असतात त्या दरांची सरासरी काढून सोन्याचा भाव ठरवला जातो. सोने आपल्या बँका परदेशी बँकांकडून खरेदी करतात. त्याच्यावर त्यांचे सर्व्हिस चार्जेस लागतात आणि डिलर्सना विकतात. त्यानंतर डिलर्स ते सोन्याचे व्यापारी आणि दुकानदारांना विकतात. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय भाव आणि भारतातल्या भावात तफावत आढळून येते.
कोरोना संकट अन् GDP घसरगुंडी; सोन्यातील गुंतवणुकीने होईल का 'चांदी'?
आम्ही सोन्यातील गुंतवणूक किती फायदेशीर आहे, यासंदर्भात ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांचं मत जाणून घेतलं.
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 09:56 AM2020-09-03T09:56:08+5:302020-09-03T10:17:10+5:30
आम्ही सोन्यातील गुंतवणूक किती फायदेशीर आहे, यासंदर्भात ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांचं मत जाणून घेतलं.
Highlightsकठीण काळात घराला आणि पर्यायानं संसाराला हातभार लावणारं साधन म्हणूनही सोन्याकडे पाहिलं जातं. सोनं हे भारतीय लोकांसाठी गर्वाचं आभूषण आहे. पारंपरिक गुंतवणुकीच्या साधनांमध्ये सोन्याचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. लोकांचा सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे कल वाढला आहे.