कोरोना काळात बाधित झाल्यास उपचारांसाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज लागत आहे. एवढे पैसे आणायचे कुठून असा प्रश्न अनेकांना पडत आहे. हॉस्पिटल दिवसाला 8 ते 10 हजार रुपये आकारत आहेत. अशावेळी जर 15 दिवस हॉस्पिटलमध्ये (Corona Treatment in hospital) दाखल व्हायचे म्हटले तर जवळपास दीड ते दोन लाख रुपये एकाला खर्च येत आहे. न होवो, परंतू घरातील एकापेक्षा जास्त व्यक्तींना हॉस्पिटलाईज कराय़ची वेळ आली तर हा खर्च कसा उभारायचा असा प्रश्न आहे. यासाठी सरकारी म्हणजेच सार्वजनिक क्षेत्रातील बँका तुम्हाला कोरोना उपचारासाठी 5 लाखांपर्यंतचे पर्सनल लोन देत आहेत. (Public sector banks (PSB) will provide unsecured personal loans of up to Rs 5 lakh to individuals for meeting their expenses of Covid treatment.)
कोरोनाची दुसरी लाट तीव्र झाल्यामुळे अनेकांना हॉस्पिटल ऑक्सिजन बेड, आयसीयुची गरज लागली आहे. यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँक असोसिएशनने एका संयुक्तीक पत्रकार परिषदेत या योजनेची घोषणा केली आहे.
या सरकारी बँका तुम्हाला कोरोना उपचारासाठी पैशांची गरज असल्यास असुरक्षित वैयक्तिक कर्ज देणार आहेत. यामध्ये 25 हजारांपासून 5 लाखांपर्यंत हे अर्थ सहाय्य सॅलरीड, नॉन सॅलरीड आणि पेन्शनधारकांना दिले जाणार आहे.
यावेळी बँकांनी आपण ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी देखील हेल्थकेअर बिझनेस लोन पुरवत असल्याचे स्पष्ट केले. अर्थ मंत्रालयाने नुकतेच हॉस्पिटलना 2 कोटींपर्यंतचे कर्ज 7.5 टक्क्यांच्या व्याजदराने दिले जाणार असल्याची घोषणा केली होती. ECLGS 4.0 नुसार हे कर्ज दिले जाणार आहे. यामध्ये नर्सिंग होम, ऑक्सिजन प्लँटसाठी 100 टक्के गॅरंटीसह हे कर्ज दिले जाणार आहे.
याचसोबत हेल्थकेअर फॅसिलिटीसाठी 100 कोटींपर्यंतचे कर्ज कंपन्यांना त्यांच्या पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी दिले जाणार आहे.
कोरोना रुग्णांवर उपचारासाठी दिले जाणारे पर्सनल लोन हे माफक व्याजदरात दिले जाणार आहे. तसेच ही य़ोजना व्यापकपणे राबविण्यासाठी नियम आणि अटी देखील सरकारी बँकांनी एकत्र येऊन ठरविल्याचे सांगण्यात आले आहे.