Bitcoin Price Rise : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विजयी झाल्यानंतर क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनला पुन्हा चर्चेत आले आहे. निवडणूक निकालानंतर बिटकॉइनच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. बिटकॉइनने गेल्या १३ वर्षांत दिलेला परतावा ऐकून कोणाचेही डोळे पांढरे होतील. जर एखाद्याने २०११ मध्ये बिटकॉइनमध्ये फक्त १०० रुपये गुंतवले असतील तर तो आता करोडपती झाला आहे. त्यांच्या १०० रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता १.६५ कोटी रुपये झाले आहे.
जेव्हा २००९ मध्ये बिटकॉइन लाँच करण्यात आले. तेव्हा त्याची सुरुवातीची किंमत शून्य होती. २०२४ पर्यंत त्याची किंमत १ कोटी रुपयांच्या आसपास पोहोचली आहे. 24 नोव्हेंबर रोजी बिटकॉइनची किंमत ९७,६५४.९ डॉलर (अंदाजे ८२.४३ लाख रुपये) होती. बिटकॉइनचा हा प्रवास केवळ रोमांचकच नाही तर धक्कादायकही आहे.
१०० रुपयांमध्ये २.२२ बिटकॉइन मिळायचे
२०११ मध्ये बिटकॉइनची किंमत फक्त १ डॉलर होती. म्हणजे फक्त ४५.५० रुपये. त्यावेळी तुम्ही १०० रुपयांना २.२२ बिटकॉईन खरेदी करू शकत होता. आता एक बिटकॉइन ९७,६५४.९ डॉलरमध्ये उपलब्ध आहे. म्हणजेच १३ वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या २.२२ बिटकॉइनची किंमत आता १.६५ कोटी रुपये झाली आहे. म्हणजेच १०० रुपये बिटकॉइनमध्ये गुंतवणारी व्यक्ती आज करोडपती आहे.
कोरोना काळात वाढला भाव
जगभरात २०२० मध्ये कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन आणि आर्थिक संकट ओढावले होते. मात्र, याच काळात बिटकॉइनची भरभराट झालेली पाहायला मिळाली. वर्षाच्या सुरुवातीला बिटकॉइनची किंमत ७,१०० डॉलर होती. वर्षाच्या अखेरीस ती २९,००० डॉलरच्या जवळपास पोहोचली. म्हणजे तब्बल ४००% ची प्रचंड वाढ झाली. २०२१ मध्ये बिटकॉइनने नवे विक्रम प्रस्थापित केले. जानेवारीमध्ये ते ४०,००० डॉलरवर पोहोचले आणि एप्रिलपर्यंत ६०,००० डॉलरचा टप्पा ओलांडला. मात्र, त्यानंतर २०२२ आणि २०२३ मध्ये बिटकॉइनच्या किमतीत घसरण सुरू झाली. २०२२ च्या अखेरीस ते २०,००० डॉलरच्या खाली आले आणि २०२३ च्या सुरुवातीला १६,५३० डॉलरवर घसरले.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामुळे मिळाला बूस्ट
बिटकॉइनच्या अलीकडच्या वाढीचे रहस्य अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक आश्वासनांमध्ये आहे. त्यांनी अमेरिकेला "बिटकॉइन आणि क्रिप्टोकरन्सीची राजधानी" बनवण्याचे वचन दिले. या वचनामुळे क्रिप्टो मार्केटमधील गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. निवडणुकीपासून बिटकॉइनची किंमत सुमारे ४०% वाढली आहे.