Bitcoin Crosses One Lakh Dollars : अमेरिकेच्या अध्यक्षपदावर लवकरच डोनाल्ड ट्रम्प विराजमान होणार आहेत. मात्र, त्यांच्या पदावर बसण्याआधीच अनेक गोष्टींत बदल होऊ लागले आहेत. शेअर मार्केटमध्ये तेजीने या बदलाची सुरुवात झाली. डिजिटल करन्सी बिटकॉइनने यात आणखी भर घातली आहे. यावर्षीच्या जुलैच्या शेवटच्या दिवसात डोनाल्ड ट्रम्प नॅशविल बिटकॉइन कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते. तेव्हा सत्तेत आल्यानंतर अमेरिकेला जगाची क्रिप्टो कॅपिटल बनवू, असा दावा त्यांना केला होता. त्याच दिवशी बिटकॉइनच्या किमतीत ४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली होती. मात्र, आता बिटकॉइनच्या किमतीने इतिहास रचला आहे.
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जेव्हा अमेरिकन निवडणुकांचे निकाल येत होते तेव्हा बिटकॉइनची किंमत ६७ ते ६८ हजार डॉलर्स दरम्यान होती. तेव्हा बिटकॉइनची किंमत एवढ्या लवकर ऐतिहासिक पातळीवर पोहचेल असं कोणालाच वाटलं नसेल. ५ नोव्हेंबरपासून बिटकॉइनच्या किमतीत ५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
बिटकॉइनची किंमत एक लाख डॉलरच्या पुढे
कॉइनमार्केट डेटानुसार, बिटकॉइनची किंमत ७ टक्क्यांहून अधिक वाढीसह १०२,६५६.६५ डॉलरवर व्यापार करत आहे. ट्रेडिंग सत्रादरम्यान बिटकॉइनच्या किमती १०३,९००.४७ वर पोहोचली होती. दरात ज्याप्रकारे वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे, त्यामुळे भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, गेल्या २४ तासांत बिटकॉइनची किंमत ९४,६६०.५२ डॉलरच्या खालच्या पातळीवर पोहोचली होती. आता बिटकॉइनची किंमत लवकरच १.२५ लाख डॉलरपर्यंत पोहोचेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर क्रिप्टोकरन्सी आणि त्याच्या बाजाराबाबत काही सकारात्मक घोषणा होऊ शकतात.
एका महिन्यात ५० टक्के वाढ
जेव्हापासून अमेरिकन निवडणुकांचे निकाल आले आहेत, तेव्हापासून जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात बिटकॉइनच्या किमतीत ५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या एका आठवड्याबद्दल बोलायचे झाल्यास, बिटकॉइनने गुंतवणूकदारांना ८ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. गेल्या एका वर्षात बिटकॉइनने गुंतवणूकदारांना १४५ टक्क्यांहून अधिक कमाई केली आहे. तज्ञांच्या मते, वर्षाच्या अखेरीस हा कमाईचा आकडा वाढलेला दिसेल.