Join us

गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; Bitcoin ची किंमत वर्षभराच्या उच्चांकी स्तरावर, पाहा किती झाले दर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 10:32 AM

सर्वात लोकप्रिय आणि सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉइनच्या गुंतवणूकदारांसाठी दीर्घ काळानंतर आनंदाची बातमी समोर आली आहे.

Bitcoin Price Today: मार्केट कॅपच्या दृष्टीने जगातील सर्वात जुनी, सर्वात लोकप्रिय आणि सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी (Bitcoin) असलेल्या बिटकॉइनच्या गुंतवणूकदारांसाठी दीर्घ काळानंतर आनंदाची बातमी समोर आली आहे. शुक्रवारी त्याची किंमत एक वर्षाच्या उच्चांकावर पोहोचली. सत्रादरम्यान, बिटकॉइनची किंमत ३१४०० डॉलर्सवर पोहोचली होती. परंतु नंतर यात पुन्हा घसरण झाली.या आठवड्यात एप्रिलनंतर प्रथमच बिटकॉइनची किंमत ३०००० डॉलर्सच्या वर पोहोचली. बिटकॉइनच्या किमतीत यंदा ८७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अलीकडे अनेक वित्तीय कंपन्यांनी क्रिप्टोकरन्सीमध्ये स्वारस्य दाखवलं आहे. याच कारणामुळे बिटकॉइनच्या किमतीत तेजी पाहायला मिळतेय. २०२१ मध्ये, याची किंमत सुमारे ६८००० डॉलर्स पर्यंत पोहोचली होती. ही आजवरची बिटकॉइनची उच्चांकी पातळी आहे. मात्र गेल्या वर्षी बिटकॉइनच्या किंमतीत लक्षणीयरित्या घसरण झाली होती.

गेल्या आठवड्यात, ब्लॅकरॉकनं बिटकॉइन स्पॉट एक्सचेंज-ट्रेडेड फंडासाठी अर्ज केला. यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनच्या फाइलिंगमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. यासह, चार्ल्स श्वाब, फिडेलिटी डिजिटल अॅसेट्स आणि सिटाडेल यांच्या गुंतवणुकीसह क्रिप्टो एक्सचेंज EDX मार्केट्सने देखील डिजिटल असेट्स ट्रेडिंग प्लॅटफॉर्मसाठी अर्ज केला आहे. दरम्यान, जगातील अनेक देशांमध्ये क्रिप्टोकरन्सीविरूद्ध नियामक कारवाई अजूनही सुरू आहे. याच महिन्यात, एईसीनं अमेरिकेतील सर्वात मोठ्या क्रिप्टो एक्सचेंज कॉइनबेस विरुद्ध खटला दाखल केला. अनरजिस्टर ब्रोकरप्रमाणे ते काम करत असल्याचा त्यांच्याकडून आरोप करण्यात आलाय.

का झाली घसरण?याच्या एक दिवस आधी फेडरल रेग्युलेटर्सनी बायनेन्सविरोधात खटला दाखल केला. कंपनीवर अमेरिकेत अवैध एक्सचेंज चालवल्याचा आरोप आहे. बिटकॉइनमध्ये अलिकडच्या काळात तेजी आली आहे, परंतु तरीही त्याच्या आजवरच्या उच्चांकी स्तरापासून खूप लांब आहे. २०२१ मध्ये, त्याची किंमत ६८ हजार डॉलर्सच्या वर गेली होती. पण फेडरल रिझर्व्हनं व्याजदर वाढवल्यामुळे बिटकॉइनला गेल्या वर्षी खूप मोठा फटका बसला. क्रिप्टो एक्सचेंज एफटीएक्स बुडल्यानं क्रिप्टो मार्केटवरही परिणाम झाला. यामुळे सुरू झालेल्या विक्रीमुळे क्रिप्टोकरन्सीच्या किमतीत मोठी घसरण झाली.

टॅग्स :क्रिप्टोकरन्सीबिटकॉइन