सर्वात प्रमुख क्रिप्टोकरन्सीबिटकॉइनच्या किमतीत गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाढ होत आहे. काल बुधवारी सलग पाचव्या दिवशी बिटकॉईनच्या किमतीत वाढ झाली. या महिन्यातच त्याची किंमत सुमारे 50 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या काही वर्षातील ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
बुधवारी, बिटकॉइनच्या किंमतीत ४.१ टक्क्यांची वाढ झाली आणि तो ५९,०५३ डॉलर्सच्या पातळीवर बंद झाला. म्हणजेच पुन्हा एकदा बिटकॉइनची किंमत ६० हजार डॉलरच्या जवळपास पोहोचली आहे. भारतीय चलनात बिटकॉइनच्या एका युनिटची सध्याची किंमत ५२.५५ लाख रुपये आहे. शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात या क्रिप्टोकरन्सीच्या किमतीत सुमारे दीड टक्क्यांनी वाढ झाली होती.
दोन वेळा ६१ हजारांपार
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार बुधवारच्या ट्रेडिंगमध्ये बिटकॉइननं लंडनच्या बाजारात प्रति युनिट ६१,३६० डॉलर्सचा उच्चांकी स्तर गाठला होता. अशाप्रकारे, बिटकॉइननं दोन वर्षांहून अधिक कालावधीत प्रथमच ६० हजार डॉलर्सची पातळी ओलांडण्यात यश मिळवलं. इतकंच नाही तर नवीन विक्रमी उच्चांकी पातळी गाठण्याच्याही ते जवळ पोहोचले आहे. बिटकॉइनची आजवरची उच्चांकी पातळी ६८,९९१ डॉलर्स आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये बिटकॉईननं हा उच्चांकी स्तर गाठला होता.
विक्रमी पातळीवर पोहोचू शकतो दर
पुरवठा कमी झाल्याच्या स्पेक्युलेशनमुळे बिटकॉइनची किंमत वाढत असल्याचं विश्लेषकांचं मत आहे. ईटीएफसह इतर अलीकडील घटना देखील बिटकॉइनच्या स्पेक्युलेटिव्ह डिमांडला वाढवत आहेत. एप्रिलपर्यंत बिटकॉइनची किंमत प्रति युनिट ७० हजार डॉलर्सच्या पुढे जाऊन नवी विक्रमी पातळी गाठू शकते, असा बाजाराचा अंदाज आहे.(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)