Crypto Investment : गुंतवणूकदारांवर पुन्हा एकदा क्रिप्टोकरन्सीची (Cryptocurrency) क्रेझ वाढताना दिसत आहे. भारतातील क्रिप्टोकरन्सीच्या वाढीवर नजर टाकली तर गेल्या ६ महिन्यांत एका मोठ्या क्रिप्टो एक्स्चेंजच्या ग्राहकांची संख्या झपाट्यानं वाढली आहे. त्याचबरोबर क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्येही अनेक बदल पाहायला मिळत आहेत.
आघाडीची क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज वजीर एक्सच्या ग्राहकांमध्ये गेल्या सहा महिन्यांत १२२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीनं ऑक्टोबर २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीचा ट्रान्सपरन्सी रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार त्याच्या प्लॅटफॉर्मवरील व्यापारातही गेल्या ६ महिन्यांत २१७ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.
बिटकॉईनमध्ये प्रचंड वाढ झाली
बिटकॉइन क्रिप्टोकरन्सीमधील सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी आहे. गेल्या १ वर्षातील बिटकॉइनचा परतावा पाहिला तर त्यात ११३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. वर्षभरापूर्वी बिटकॉईनची किंमत २९,२४५ डॉलर होती, ती आता ६३,७१८ डॉलरच्या आसपास पोहोचली आहे.
बिटकॉईनमध्ये परत आलेली चमक ही क्रिप्टोकरन्सी पुन्हा लोकांमध्ये लोकप्रिय होत असल्याचं दाखवत आहे. बिटकॉईनचे बाजार भांडवल सध्या १.२५ ट्रिलियन डॉलरवर पोहोचलं आहे. त्याचप्रमाणे इतर क्रिप्टोकरन्सीमध्येही तेजी दिसून येत आहे. क्रिप्टोकरन्सीच्या वाढीचं आणखी एक कारण म्हणजे अमेरिकेत नवीन कायद्यांवर चर्चा सुरू होणं हे आहे. अमेरिकेत सरकार लवकरच गुंतवणुकीसाठी असेट्स क्लास वर्गातील क्रिप्टोकरन्सीला कायदेशीर मान्यता देऊ शकते. तेथील अनेक राज्यांमध्ये या दिशेनं कामही सुरू झालं आहे. त्यामुळे त्याच्या किमतीतही तेजी दिसून येत आहे.
(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)