Gold Silver Price 17 April: लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ होताना दिसतेय. ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरदरम्यान १७ एप्रिल रोजी सराफा बाजारात सोनं एक लाख रुपयांच्या अगदी जवळ पोहोचलंय. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ९५,२०७ रुपये प्रति १० ग्रॅमच्या उच्चांकी पातळीवर पोहोचलाय. आज सोन्याच्या दरात ६२८ रुपयांनी वाढ झाली आहे. तर, चांदी १०३६ रुपयांनी घसरून ९५,६३९ रुपये झाली आहे. जीएसटीमुळे २४ कॅरेट सोन्याचा भाव आता ९८,०६३ रुपये आणि चांदीचा भाव ९८,५०८ रुपये झाला आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (आयबीजेए) सराफा बाजाराचे दर जाहीर केले आहेत, ज्यात जीएसटीचा समावेश नाही. कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकतो. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास, तर दुसऱ्याला सायंकाळी ५ च्या सुमारास दर जाहीर केले जातात.
सोन्याच्या वाढीची कारणे
केडिया कमोडिटीजचे अध्यक्ष अजय केडिया यांच्या मते, ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरमुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. जागतिक बाजारात आर्थिक मंदीची चिन्हे आहेत. व्यापारयुद्ध वाढत असून भूराजकीय तणाव कमी होण्याचं नाव घेत नाही. मध्यवर्ती बँका खरेदी करत आहेत. ईटीएफमधील खरेदीमुळे सोन्यातही लक्षणीय वाढ दिसून आली आहे.
दर घसरण्याची शक्यता आहे का?
"सोन्याच्या दरात करेक्शनला वेळ लागेल. सहा ते आठ महिने हा बाजार या मर्यादेत राहणार आहे. कारण, गेल्या २० वर्षांत सोन्यात १० टक्क्यांपेक्षा जास्त करेक्शन कधीच झालं नाही. पुढच्या अक्षय्य तृतीयेपर्यंत सोनं घसरलं तर ते ७८००० ते ८०००० पर्यंत येईल आणि वरच्या स्तरावर ते १०२००० रुपयांपर्यंत पोहोचू शकते," असं सोन्याचे दर असेच वाढत राहतील का? या प्रश्नावर उत्तर देताना केडिया यांनी हिंदुस्थानला सांगितलं.
जास्त काळ सोनं ठेवणं फायदेशीर
एचएसजे लखनौचे संचालक अंकुर आनंद यांच्या म्हणण्यानुसार 'जेव्हा जेव्हा शेअर बाजारात उलथापालथीचा काळ असतो, तेव्हा सोन्यातील गुंतवणुकीकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं. सध्या शेअर बाजारातील चढउतार पाहता सोन्याची खरेदी-गुंतवणूक करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. सोनं बऱ्याच काळापासून चांगला परतावा देत आहे. सोनं दीर्घकाळ ठेवणं फायदेशीर ठरतं आणि सोन्याचे दर वाढल्यानंतरही त्यात गुंतवणूक करणं गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरेल.'