नवी दिल्ली : सन २०२० वर्ष कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे एकूणच जगासाठी अतिशय कठीण केले. भारतातही त्याचे दूरगामी परिणाम पाहायला मिळाले. कोरोना संकटामुळे 'न भूतो' असा लॉकडाऊन (Corona Lockdown) करण्यात आला. यामुळे अनेक रोजगारांवर गदा आली. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून एक आकडेवारी जारी करण्यात आली. लोकसभेत विचारलेल्या एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना कंपनी व्यवहार मंत्रालयाने आकडेवारी जारी करत गेल्या १० महिन्यांत १० हजार कंपन्या बंद झाल्याची माहिती दिली आहे. (govt data reveals 10 113 companies voluntarily shuttered operations during apr 2020 Feb 2021 period)
मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या गेल्या १० महिन्यांच्या कालावधीत देशातील तब्बल १० हजार ११३ कंपन्या बंद झाल्या. कोणतीही दंडात्मक कारवाई न करता स्वइच्छेने बंद झालेल्या कंपन्यांची ही आकेडवारी असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले. लॉकडाउनमुळे देशातील आर्थिक व्यवहारांना खूप मोठा फटका बसला. त्यामुळेच या हजारो कंपन्या बंद करण्यात आल्या, असे सांगितले जात आहे.
राम मंदिराला देणगी न दिल्याने नोकरीवरून काढले? RSS संचालित शाळेतील प्रकार
महाराष्ट्रात किती कंपन्या बंद?
लोकसभेमध्ये विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना कंपनी व्यवहार मंत्रालयाचे राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकुर यांनी सांगितले की, ज्या कंपन्या आपल्या व्यवसायामधून बाहेर पडल्या आहेत त्यांची आकडेवारी मंत्रालयाकडे उपलब्ध नसते. मंत्रालयाने कंपन्यांविरोधात कारवाई केल्याने त्या बंद करण्यात आलेल्या नाहीत, असे राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. दिल्लीमध्ये सर्वाधिक म्हणजेच २ हजार ३९४ कंपन्या, यानंतर उत्तर प्रदेशमध्ये एक हजार ९३६ कंपन्या बंद पडल्या. सर्वाधिक कंपन्या बंद पडलेल्या यादीत अव्वल पाच राज्यांच्या यादीत तामिळनाडू, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांचा समावेश आहे. यापैकी तामिळनाडूत १३२२ कंपन्या, महाराष्ट्रात १२७९ कंपन्या आणि कर्नाटकमध्ये ८३६ कंपन्या बंद पडल्या आहेत.
पश्चिम बंगालमध्ये सर्वांत कमी कंपन्या बंद
चंडीगड आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी ४७९ कंपन्या, तेलंगणात ४०४ कंपन्या, केरळमध्ये ३०७ कंपन्या, झारखंडमध्ये १३७ कंपन्या, मध्य प्रदेशात १११ कंपन्या, बिहारमध्ये १०४ कंपन्या, मेघालयमध्ये ८८ कंपन्या, ओडिसामध्ये ७८ कंपन्या, छत्तीसगडमध्ये ४७ कंपन्या, गोव्यात ३६ कंपन्या, पुदुच्चेरीमध्ये ३१ कंपन्या, गुजरातमध्ये १७ कंपन्या, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक कमी म्हणजे चार कंपन्या बंद पडल्या. भारतातच भाग असलेल्या अंदमान निकोबारमध्ये केवळ दोन कंपन्या बंद झाल्याची माहिती केंद्राकडून देण्यात आली.
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च २०२० च्या शेवटच्या आठवड्यापासून केंद्र सरकारने देशभरामध्ये लॉकडाऊनची घोषणा केली होती. कंपन्यांना सर्व नियमांचे पालन करून मे महिन्यापासून हळूहळू काम करण्यास सुरुवात करावी लागली. मात्र, या लॉकडाऊनच्या कालावधीत कंपन्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. या कारणामुळेच हजारो कंपन्यांनी आपला कारभार बंद केला, असे सांगितले जात आहे.