HDB Financial Services IPO : एचडीएफसी बँकेची उपकंपनी एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसनं आयपीओद्वारे १२,५०० कोटी रुपये उभे करण्यासाठी भांडवली बाजार नियामक सेबीकडे सुरुवातीची कागदपत्रे दाखल केली आहेत. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (SEBI) दाखल केलेल्या कागदपत्रांनुसार, प्रस्तावित आयपीओ हा २,५०० कोटी रुपयांच्या इक्विटी शेअर्सचा फ्रेश इश्यू आणि प्रवर्तक एचडीएफसी बँकेनं १०,००० कोटी रुपयांच्या ऑफर फॉर सेलचा (ओएफएस) मिळून आहे. सध्या एचडीएफसी बँकेचा एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये ९४.३६ टक्के हिस्सा आहे.
कंपनी पैसे कुठे वापरणार?
नव्या इश्यूमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वापर टियर-१ कॅपिटल बेस मजबूत करण्यासाठी करण्याचा कंपनीचा प्रस्ताव आहे. यामुळे भविष्यातील भांडवली गरजा भागतील, ज्यात व्यवसाय वाढीस आधार देण्यासाठी अतिरिक्त कर्ज घेण्याचा समावेश असेल. एचडीबी फायनान्शिअल सर्व्हिसेसला लिस्ट करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ऑक्टोबर २०२२ च्या आदेशानंतर घेण्यात आला आहे, ज्यानुसार अपर लेव्हल एनबीएफसीला तीन वर्षांच्या आत शेअर बाजारात लिस्ट करणं आवश्यक आहे.
या महिन्यात मंजुरी मिळाली
एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळानं या महिन्याच्या सुरुवातीला एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस या उपकंपनीशी संबंधित १०,००० कोटी रुपयांच्या ऑफर फॉर सेल (OFS) सह १२,५०० कोटी रुपयांच्या शेअर्स विक्रीला मंजुरी दिली होती. प्रस्तावित आयपीओनंतर, एचडीबी फायनान्शिअल सर्व्हिसेस लागू नियमांच्या तरतुदींच्या अधीन राहून बँकेची उपकंपनी राहील.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)