नवी दिल्ली : प्राप्तिकर परताव्यांचे दावे दाखल करण्याच्या प्रक्रियेची प्राप्तिकर विभागाने गेल्या वर्षी फेररचना केली. प्राप्तिकर परतावा आपल्या ज्या बँक खात्यात जमा व्हावा, असे वाटते ते खाते प्राप्तिकर विवरणपत्रावर नोंदवणे आवश्यक आहे.
याशिवाय तुमचा क्रमांक बँक खात्याशी जोडलेला असणे आवश्यक आहे. गेल्या वर्षापासून केवळ ई-परतावे देण्याचा निर्णय प्राप्तिकर विभागाने घेतला आहे. त्यामुळे प्राप्तिकर विभागाच्या वेबसाइटवर बँक खात्याची नोंदणी करणेही आवश्यक आहे. ई-परताव्यामुळे वेळेची बचत होते.
कसा करावा परतावा दावा?
ई-हस्तांतर व्यवस्थेत केवळ आयटीआर दाखल करून कर परताव्यावर दावा केला जाऊ शकतो. आयटीआर प्रत्यक्ष किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने १२० दिवसांत पडताळून घेणे आवश्यक आहे.
कोण करू शकते परताव्याचा दावा?
रोजगारदाता संस्थेकडे सर्व गुंतवणूक पुरावे सादर करूनही जास्तीचा प्राप्तिकर कापला गेला असणारे करदाते.
बँकांतील ठेवी आणि रोख्यांच्या व्याजावर जास्तीचा टीडीएस कापला गेलेले करदाते.
स्वयंमूल्यांकनात कर भरणा केल्यानंतर प्रत्यक्षातील देयता कमी निघालेले करदाते. ज्यांना दुहेरी कर लावला गेला आहे.
परताव्याची स्थिती कशी तपासावी?
एनएसडीएल वेबसाइटवर
पायरी १ - एनएसडीएल वेबसाइटवर जावे.
पायरी २ - अवतरणाऱ्या वेबपेजवर सर्व तपशील भरावा व प्रोसिडचे बटन दाबावे.
पायरी ३ - परताव्याची स्थिती वेबपेजवर अवतरेल.
ई-फायलिंग पोर्टलवर
पायरी १ - ई-फायलिंग पोर्टलवर लॉग इन करावे.
पायरी २ - व्ह्यू रिटर्न/फॉर्मचा पर्याय निवडावा.
पायरी ३ - माय अकाउण्टवर जाऊन ‘इन्कम टॅक्स रिटर्न’चा पर्याय निवडावा.
पायरी ४ - ॲकनॉलेजमेंट नंबरवर क्लिक करावे.
पायरी ५ - वेबपेजवर कर विवरणपत्र आणि परताव्याची स्थिती प्रगटेल.
फॉर्म ‘२६एएस’मध्ये अतिरिक्त कर भरणा दिसायला हवा
परतावा प्राप्तिकर विभागाच्या पडताळणीच्या अधीन असतो. दावा वैध असल्याचे आढळले तरच परतावा अदा केला जातो.